मुंबई : घर खरेदी, वाहन खरेदी तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी आपण बँकांकडून कर्ज घेतो. मात्र कर्ज घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कर्ज घेताना आपण सर्वप्रथम कमीत-कमी व्याजदर असावा, असा विचार करतो. मात्र व्याजदराशिवाय इतरही काही गोष्टी असतात, ज्यांचा विचार करणे गरजेचे असते. या कोणकोणत्या गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घेणे गरजेचे आहे? हे जाणून घेऊ या...
कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज हवे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळतो. जेवढा चांगला क्रेडिट स्कोअर तेवढ्याच कमी व्याजदारात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.चांगला क्रेडिट स्कोअर असणे म्हणजेच तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर फेडता, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळेच चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि लवकर कर्ज देतात.
कर्जाची इतर बँकांशी तुलना करा
तुम्ही एखादे छोटे कर्ज घेत असाल तर इतर बँकांच्या ऑफर्सची तुलना नाही केली तरी चालेल. मात्र तुम्ही मोठे कर्ज घेत असाल तर ते घेण्याअगोदर तुम्ही वेगवेगळ्या बँकांकडून कर्जावर कोणती सवलत दिली जात आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेल्या कर्जाची तुलना इतर बँकांच्या कर्जाशी करायला हवी. विशेष म्हणजे इतर बँकांशी तुलना करताना फक्त व्याज दर विचारात घेऊ नये. अन्य हिडन चर्जेसचाही विचार करायला हवा. यासह अन्य प्रोसेसिंग फीचाही विचार करायला हवा.तुम्ही घेत असलेले कर्ज फिक्स आहे की रिड्यूसिंग आहे, याचाही विचार व्हायला हवा.
कमी व्याजदर मिळवण्यासाठी बँकेला विनंती करा
तुम्ही कर्ज घेताना वेगवेगळ्या बँकांशी तुलना करत असाल तर कमी व्याजदर मिळावा म्हणून बँकांना विनंती करा. त्यासाठी कोणताही संकोच बाळगू नका. कदाचित तुमच्या विनंतीचा विचार करून बँक तुम्हाला कर्जादरावरील व्याजदर कमीदेखील करू शकते.
योग्य कर्जाची निवड करा
पर्सनल लोन घेताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. सिक्योर्ड लोनवरील कर्जावर कमी व्याजदर असतो. अनसिक्योर्ड लोनवर मात्र व्याजदर जास्त असतो. त्यामुळेच सिक्योर्ड लोन घेण्याला प्राधान्य द्यायला हवे. एफडी, म्युच्यूअल फंड किंवा अन्य एखाद्या गुंतवणुकीवर तुम्ही सिक्योर्ड लोन घेऊ शकता.
कर्जाच्या परतफेड कालावधीकडे लक्ष ठेवा
तुम्ही जेव्हा बँकेकडून कर्ज घेता तेव्हा बँक तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स देते. दीर्घ मुदतीच्या कर्जावर तुम्हाला कमी ईएमआय दिला जातो. मात्र दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजदर जास्त असतो. त्यामुळे कर्ज घेताना परतफेड कालावधी कमीत कमी कसा राहील, याकडे लक्ष द्या. या गोष्टींची काळजी घेतली तर कर्ज घेताना तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
हेही वाचा :
भविष्यातही सोनं चकाकणार! भाव 86000 रुपयांपर्यंत वाढणार; जाणून घ्या सविस्तर!