GST Collection Data नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या निमित्तानं बाजारापेठेत मोठी उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केल्यानं वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये साधारणपणे 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 1,87,346 कोटींवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये हे कलेक्शन 1.73 लाख कोटी रुपये होते. जीएसटी रिफंड केल्यानंतर एकूण कलेक्शनमध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली असून ते 168041 कोटी रुपये झालं आहे.
वस्तू आणि सेवा कराचे ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचं एकूण जीएसटी कलेक्शन 1,87,346 कोटी रुपये होतं. त्यामध्ये सीजीएसटी 33821 कोटी तर एसजीएसटी 41864 कोटी रुपये होतं. आयजीएसटी 54878 कोटी आणि सेसे 11688 कोटी रुपये इतका होता. ग्रॉस डोमेस्टिक रेवेन्यूमध्ये 10.6 टक्के वाढ पाहायला मिळाली. तर, इम्पोर्टसच्या बाबतीत आयजीेसटी 44233 कोटी रुपये आणि सेस 862 कोटी इतका झाला आहे.
एकूण जीएसटी कलेक्शन 1,87,346 कोटी असून त्यापैकी 19,306 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 16,335 कोटी रुपयांचा रिफंड करण्यात आला होता. म्हणजे यावेळी 18.2 टक्के वाढ पाहायला मिळाली. यंदाच्या आर्थिक वर्षात 12,74,442 कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जीएसटी कलेक्शन 11,64,511 कोटी रुपये झालं होतं म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत 9.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.
राज्यांचा विचार केला असता सर्वाधिक जीएसटी कलेक्शन महाराष्ट्रात पाहायला मिळालं आहे. राज्यातील जीएसटी कलेक्शनमध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात 31030 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं आहे. तर, गेल्या वर्षी 27309 कोटी रुपये झालं होतं. उत्तर प्रदेशमध्ये 9602 कोटी, कर्नाटकमध्ये 13,081 कोटी, गुजरातमध्ये 11,407 कोटी, हरियाणात 10045 कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं आहे. या सर्व राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शन वाढलं आहे. तर,हिमाचल प्रदेशमध्ये 2 टक्के, मणिपूरमध्ये 5 टक्के आणि छत्तीसगडमध्ये 1 टक्के कलेक्शन घटलं आहे.
इतर बातम्या :
भारतीय नोकरदारांवर वाढतोय कर्जाचा डोंगर, सर्वेक्षणातून आली धक्कादायक माहिती समोर