सिल्लोड: शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील (Sillod Assembly Constituency) उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.


अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Sillod Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार करणारे तक्रारदार शंकरपेल्ली यांनी सांगितले की, याबाबत लवकरच सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील तरतुदी अनुसार फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर, उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणाक आहे.


नेमकं प्रकरण काय?


महायुती शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील (Sillod Assembly Constituency) उमेदवार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपला उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याची तक्रार आहे. मालमत्ता, चारचाकी वाहन आणि दागिन्यांशी संबंधित खोटी माहिती दिली असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.


निवडणूक आयोगाने (Election Commission) या तक्रारीची गंभीर दखल घेतली. त्यानंतर आता 24 तासांत याबाबतची माहिती देण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्तारांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीचे माहिती देण्याबाबतचे निर्देश दिले असल्याने अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 16 मुद्यांद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार अब्दुल सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असे म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने खरी माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.