TATA Group Ceiling Home Appliance Business: टाटा समूह 70 वर्ष जुनी VOLTAS कंपनी विकणार? चर्चांवर कंपनी म्हणते...
TATA Group Voltas Home Appliance: टाटा समुहानं भारतीयांच्या मनावर गेल्या 70 वर्षांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
TATA Group Looking at Selling Off Voltas Home Appliance: प्रत्येक भारतीयांच्या घरात आणि मनात वसलेला विश्वासार्ह्य ब्रँड म्हणजे, टाटा. टाटा (TATA) असा उल्लेख कोणी केली तरीही सर्वांच्या नजरा विश्वासानं वळतात. कोणतीही वस्तू खरेदी करताना टाटाच्या प्रोडक्ट्सना पहिलं प्राधान्य असतं. अशातच आता टाटा समुहाच्या (TATA Group) एका कंपनीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टाटा समुहाचा व्होल्टास ब्रँड (Voltas Home Appliance) हा होम अप्लायन्स क्षेत्रातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह्य ब्रँड. विशेषत: एअर कंडिशनर आणि वॉटर कूलर मार्केटमध्ये व्होल्टासचं वर्चस्व आहे. पण आता हीच व्होल्टास कंपनी टाटा समूह विकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
टाटा समूह होम अप्लायन्स कंपनी व्होल्टास विकण्याचा विचार करत आहे, अशी माहिती एका रिपोर्टच्या हवाल्यानं समोर आली आहे. या डीलमध्ये जॉईंट वेंचर पार्टनर Arcelik AS च्या समावेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
चर्चांना उधाण का?
सूत्रांच्या हवाल्यानं ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, स्पर्धात्मक बाजारपेठेत व्यवसायाचा विस्तार करण्याच्या आव्हानांमुळे टाटा समूह व्होल्टास लिमिटेडचा व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. मात्र, व्होल्टासनं यासर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
व्होल्टासनं याबाबत काय म्हटलंय?
"व्होल्टास लिमिटेड स्पष्टपणे सांगू इच्छिते की, कंपनीची विक्री करण्यात येणार असल्याचा दावा करणार्या बातम्या धादांत खोट्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नाही.", असं कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, "कंपनी रूम एअर कंडिशनर्समध्ये बाजारपेठेत लीडवर आहे आणि तिचा Arcelik सह Voltas.Beko उत्पादनांसाठीचा संयुक्त उपक्रम अप्लायन्सेस व्यवसायातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे. कंपनी सातत्यानं प्रगती करतेय आणि कंपनीनं सर्व उत्पादन श्रेणींमध्ये कमाईचं लक्ष्य गाठलं आहे. येत्या काळात कंपनी आपलं बाजारातील आघाडीचं स्थान आणखी मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त करत व्यवसायाप्रती आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करते."
व्होल्टासबाबत सर्वकाही...
स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये व्होल्टास कंपनी सुरू झाली. सध्या कंपनीत 1689 कर्मचारी काम करतात. व्होल्टास कंपनीचं मुख्यालय मुंबईतच आहे. कंपनीत मुख्यत्वे एअर कंडिशनर्स, वॉटर कूलर, एअर कूलर (Air Coolers), रेफ्रिजरेटर्स (Refrigerators), वॉशिंग मशीन्स (Washing Machines), डिशवॉशर्स (Dishwashers), मायक्रोवेव्ह (Microwaves), एअर प्युरिफायर (Air purifiers) आणि होम अप्लायन्सेसशी संबंधित व्यवसाय करते.
कंपनीचा भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत व्यवसाय आहे. ब्लूमबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं, त्याचाच परिणाम शेअर मार्केटवरही झाल्याचं पाहायला मिळाला, मंगळवारी व्होल्टासच्या शेअर्समध्ये काहीसा दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी व्होल्टासचा शेअर 1.70 टक्क्यांनी घसरला आणि 813.80 रुपयांवर बंद झाला.
टाटा समूह आपल्या जॉईंट व्हेंचर Arcelik AS सह भारतात व्होल्टास व्यवसाय करत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत, रेफ्रिजरेटर्ससाठी व्होल्टासचा भारतातील बाजारातील हिस्सा 3.3 टक्के आणि वॉशिंग मशीनसाठी 5.4 टक्के होता.
Voltas Q2 Results
व्होल्टास 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 36 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला सहा कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न (total income) वाढून 2,634 कोटी रुपये झाले आहे.