Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पहिल्या तिमाहीचे निकाल 18 जुलै रोजी जाहीर होणार, कंपनीला नफा किती होणार?
Reliance Industries:मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल 18 जुलै रोजी जाहीर होणार आहेत. कंपनीनं 11 जुलै रोजी ही माहिती एक्सचेंजला दिली आहे.

Reliance Industries मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील कामगिरीचे निकाल 18 जुलै रोजी जाहीर केले जाणार आहेत. कंपनीनं 11 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुढील शुक्रवारी बोर्डाची बैठक होईल, त्यात पहिल्या तिमाहीतील कामगिरीचे निकाल जाहीर केले जातील, असं सांगण्यात आलं आहे.
18 जुलै रोजी बोर्डाची बैठक
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माहितीनुसार 18 जुलै रोजी बोर्डाच्या बैठकीनंतर 30 जुलै रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी विश्लेषकांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये कंपनीची आर्थिकी स्थिती, तिमाहीचे निकाल आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली जाईल.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज (KIE)च्या विश्लेषकांच्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा कर दिल्यानंतरचा नफा 29 टक्के राहील, असा अंदाज आहे. कर दिल्यानंतर कंपनीला 19517 कोटी रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स इंडसट्रीजनं काही दिवसांपूर्वी एशियन पेंटसमधील त्यांची 9000 कोटींची भागीदारी विकली होती. याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर दिसून येऊ शकतो. रिलायन्सनं 12 जून 2025 ला या एशियन पेंटसमधील 3.64 टक्के भागीदारी 7703 कोटी रुपयांना विकली. यानंतर कंपनीनं 16 जूनला कंपनीनं राहिलेली भागीदारी विकली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत 1 टक्के घट होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्री 231784 कोटी रुपये होती. त्यामध्ये यंदा घसरण होऊन तो 229475 कोटी राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजच्या अंदाजानुसार रिलायन्सच्या कन्सोलिडेटेड एबिटामध्ये 15.4 टक्के वाढ होऊ शकते. त्यावेळी ओ2सी, डिजिटल आणि रिटेलमध्ये 19-20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा कर दिल्यानंतरचा नफा 32 टक्क्यांच्या वाढीसह 20 हजार कोटींपर्यंत पोहोचू शकतो.कंपनीचं उत्पन्न देखील 15 टक्क्यांनी वाढून 266100 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























