Stock Market Today: शेअर मार्केट सुसाट; सेन्सेक्स 500 अकांनी वधारला, तर निफ्टी 17200 पार
Share Market Updates : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत. आज सेन्सेक्स 674 अंकांनी वधारला तर निफ्टी 184 अंकांनी वर गेला आहे.
Share Market Updates : आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी (Last Day of Financial Year) शेअर बाजारात तेजी दिसून आली. जागतिक बाजारातील (Global Market) चांगल्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) 58500 च्या वर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीही (Nifty) 17250 चा आकडा पार केला आहे. आज सेन्सेक्स 674 अंकांनी वधारला तर निफ्टी 184 अंकांनी वर गेला आहे. दरम्यान, अमेरीकेतील बाजारात तेजी बघायला मिळाल्यानं भारतीय शेअर बाजारात वृद्धी झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी मजबूत
जागतिक बाजारात कच्च्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड 79 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. इराककडून होणाऱ्या पुरवठ्यात घसरणीच्या शक्यतेनं कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी मजबूतीसह 82.12 वर उघडला आहे. आज शेअर मार्केटमध्ये अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, एचडीएफसी बॅंकसारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.
जागतिक बाजारातील परिस्थिती काय?
आशियाई बाजारात जपानचा निक्केई 1 टक्क्यांवर व्यापार करत आहे. तसेच, कोस्पी आणि हेंगसेंग इंडेक्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही खरेदी होताना दिसत आहे. NASDAQ आणि Dow देखील जवळपास अर्धा टक्क्यांच्या मजबुतीसह व्यवहार करत आहेत. अशातच आज भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी रामनवमीनिमित्त देशांतर्गत बाजारपेठा बंद होत्या. तर बुधवारी सेन्सेक्स 57960 आणि 17,080 वर बंद झाला.
मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत
सुरुवातीच्या व्यवहारांबाबत बोलायचं झाल्यास, बहुतेक मोठ्या कंपन्या वाढीच्या मार्गावर आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. आयटीसी आणि एशियन पेंट्स या दोन कंपन्यांचे शेअर्स तोट्यात उघडले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेक 2-2 टक्क्यांहून अधिक वाढीसह उघडले आहेत. याशिवाय सर्व टेक शेअर्समध्ये आज तेजी दिसून येत आहे.
बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद
काल राम नवमीनिमित्त शेअर बाजार बंद होता. पण बुधवार भारतीय शेअर बाजारासाठी (Stock Market) चांगला ठरला. बुधवारी, बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार बुधवारी वधारल्याचं पाहायला मिळालं. काल शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 346 अंकांच्या तेजीसह 57,960 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 129 अंकांच्या तेजीसह 17,080 अंकांवर बंद झाला.