मुंबई : आपल्याजवळ असलेल्या पैशांचे मूल्य वाढवे, असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेकजन वेगवेगळ्या मार्गाने पैशांची गुंतवणूक करतात. गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीसाठी म्यूच्यूअल फंडाला पसंदी मिळत आहे. लोक एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडात पैसे गुंतवत आहेत. एसआयपीच्या (SIP) मदतीने दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. एसआयपी गुंतवणुकीत एक खास फॉर्म्यूला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून थेट कोट्यधीश होऊ शकता. हा फॉर्म्यूला नेमका काय आहे? जाणून घेऊ या...
कोट्यधीश होण्याचं स्वप्न होईल पूर्ण
कोट्यधीश होण्याचं स्वप्न प्रत्येकजणच पाहतो. प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र योग्य नियोजन करून गुंतवणूक केल्यास तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एसआयपी फार मदतीला येऊ शकते. कारण एसआयपीवर चांगला परतावा मिळतो. कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त 5,400 रुपयांची एसआयपी ही 20 वर्षांपर्यंत करावी लागेल. तसे केल्यास तुम्ही थेट कोट्यधीश होऊ शकता.
5400 रुपयांची एसआयपी केल्यावर किती रुपये जमा होणार
खरं म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. त्यामुळेच अशा प्रकारची गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते. आता प्रतिमहिना 5,400 गुंतवून तुम्ही कसे कोट्यधीश होऊ शकता, हे जाणून घेऊ या. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 5400 रुपयांची एसआयपी केल्यास तुमचे एका वर्षात 64,800 रुपये जमा होतील. हीच रक्कम 20 वर्षांमध्ये 12,96,000 रुपये जमा होईल. तुम्ही गुंतवलेल्या या रकमेवर साधारण 12 टक्क्यांनी परतावा मिळाला असे गृहीत धरल्यास तुम्हाला एकूण 53,95,399 रुपये मिळतील.
प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी एसआयपी वाढवा
तुम्ही करत असलेल्या याच एसआयपीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांची वाढ केली आणि ही वाढ पुढचे 20 वर्षे चालू ठेवली तर तुम्ही कोट्यधीश व्हाल. समजा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुमच्या एसआयपीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली तर पुढच्या महिन्यात तुम्ही 5,940 रुपयांची एसआयपी कराल, तिसऱ्या वर्षाला 6,534 रुपये, चौथ्या वर्षाला 7,187 रुपये जमा केल्यास तुम्ही आगामी 20 वर्षांत तुम्ही तब्बल 1 कोटी रुपयांचा फंड उभा कराल.
स्टेप अफ एसआयपीचे अनेक फायदे
प्रत्येक वर्षाला एसआयपीमध्ये वाढ करण्याच्या या पद्धतीला स्टेप अप एसआयपी म्हटले जाते. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या रकमेत दरवर्षी एक निश्चित वाढ करता. यामुळेच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आज शेअर बाजार बंद आहे की चालू? नेमकं सत्य काय? जाणून घ्या..
रेल्वेच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स घेतल्यास पडणार पैशांचा पाऊस, दुप्पट, तिप्पट रिटर्न्स मिळणार?
क्लेम सेटलमेंटबाबत EPFO चा नवा नियम, 'या' निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार!