Piyush Goyal vs Bhushan Patil मुंबई: राज्यात आज लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 


मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांनी मतदानासाठी रांग लावलेली आहे. सकाळपासूनच मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद दिसून येतोय. याचपार्श्वभूमीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल (North Mumbai Piyush Goyal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह देशभरात मतदारांच्या लांब रांग पाहून खूप आनंद वाटतोय, असं पियुष गोयल यांनी सांगितले.


मुंबईत मतदार मोठ्या संख्येने मतदान करणार असं दिसून येत आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा जास्त मतदान होईल. जनता देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपला निर्णय देईल.  ही निवडणूक माझ्यासाठी एक वेगळा आणि चांगला अनुभव होता. यावेळी मी लाखो लोकांच्या समस्या जाणून घेतला. आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं, हे खूप समाधानकारक आहे, असं उत्तर मुंबई लोकसभेतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी सांगितले. 


पियुष गोयल यांनी मानले नागरिकांचे आभार-


उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी माझी उमेदवारी जाहिर होताच मी माझ्या प्रचाराला सुरूवात केली. या प्रचारात मी येथील लाखो मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नागरिकांना असलेले अभूतपुर्व प्रेम आणि माझ्याप्रती व्यक्त केलेल्या आपुलकीच्या भावना मला अनुभवता आल्या. याबद्दल मी येथील तमाम नागरिकांचा शतश: ऋणी आहे. या निस्सीम प्रेमाची पावती मी माझ्या कामाद्वारे देईन, अशा शब्दात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी नागरिकांचे आभार मानले. 


मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा कोणत्या?


दक्षिण मुंबई-  अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव


दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई


उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील 


उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड


उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील


वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर


देशभरातील 49 जागांसाठी मतदान 


लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या फेरीत 4.26 कोटी महिला आणि 5,409 तृतीयपंथी मतदारांसह 8.95 कोटीहून अधिक लोक मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात निवडणुका पार पाडण्यासाठी 9.47 लाख मतदान अधिकारी 94,732 मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. ज्या जागांवर मतदान होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच, जम्मू-काश्मीरमधील एक आणि लडाखमधील एकमेव जागा आहे. विशेष म्हणजे, सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर मतदान होणार आहे.


संबंधित बातमी-


लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज; देशभरात 49 जागांवर मतदान, राहुल गांधी, स्मृती इराणी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिष्ठा पणाला