मुंबई : एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) देशात पुन्हा एका मोदी हेच सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच शक्यतेचा भारतीय शेअर बाजारावर (Share Market) परिणाम झाला. या आठवड्यात आज पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या निफ्टी (NIFTY) आणि सेन्सेक्स (Sensex) या प्रमुख निर्देशांकांत मोठी तेजी पाहायला मिळाली. हे दोन्ही निर्देशांक उसळल्यामुळे गुंतवणूकदारांनी अवघ्या काही मिनिटांत लाखो कोटी रुपये कमवले आहेत. 


सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी यासह इतरही प्रमुख निर्देशांकांनी नवा स्तर गाठला. परिणामी गुंतवणूकदार अवघ्या काही मिनिटांत श्रीमंत झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 2600 अंकांनी वधारला.  सध्या सेन्सेक्स 2 हजार अकांनी तेजीत आहे. त्यामुळेच सेन्सेक्सवर लिस्टेड कंपन्यांचे भांवडल मोठ्या प्रमाणात वाढले.


गुंतवणूकदार मालामाल 


शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या भांडवलात मोठी वाढ झाली. बीएसईवरील सर्व कंपन्यांचे भांडवल तब्बल 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास सर्व कंपन्यांचे भांडवल 423.21 लाख कोटी रुपये झाले. शुक्रवारच्या तुलनेत हे भांडवल 11.1 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. म्हणजेच शेअर बाजारात गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजार चालू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत 11 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त कमाई केली. 


सध्या शेअर बाजाराची स्थिती काय?


सोमवारी बाजार चालू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही मिनिटांत निर्देशांकांत मोठी तेजी पाहायला मिळाली. सकाळी 10 वाजून 15 मिनटांनी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2,125 अंकांनी (2.87 टक्के) वाढला. त्यामुळे सेन्सेक्स थेट 76,085 अंकांवर पोहोचला. सेन्सेक्सने आज 76,738.89 अंकांपर्यंत झेप घेत ऑल टाईम हायचा रेकॉर्ड नोंदवला. निफ्टीनेदेखील 23,338.70 अंकांपर्यंत उसळी मारत नवा रेकॉर्ड नोंदवला. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता निफ्टी 650 अंकांनी (2.90 टक्के) बढत घेत 23,190 अंकांपर्यंत मजल मारली. अजूनही शेअर बाजार संपेपर्यंत मुंबई शेअर बाजार आणि भारतीय शेअर बाजार यामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात.  


पुन्हा मोदी सरकारच्या शक्यतेमुळे शेअर बाजारात तेजी


आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 76 हजार अंकांचा आकडा पार केला आहे. आज बाजारात सरासरी तीन टक्क्यांची तेजी पाहायला मिळालेली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा मोदी यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. सत्ताबदल न होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे सध्या शेअर बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. काही एक्झिट पोलमध्ये तर भाजपप्रणित एनडीए 400 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शेअर बाजारात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात. 


हेही वाचा :


गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!


एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा मोदी सरकारचा अंदाज, शेअर बाजार उघडताच मोठी उसळी, सेन्सेक्स 2200 अंकानी वधारला


पैसे ठेवा रेडी! 'हे' तीन आयपीओ तुम्हाला करू शकतात मालामाल!