मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. याच निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसतो. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाच साकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय. आज आठवड्याचा पहिल्याच दिवस आहे. या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला. प्री-ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाले.
प्री-ओपनिंग सेशनमध्ये मार्केटची काय स्थिती?
सध्या शेअर बाजाराचे निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. त्याची प्रचिती आज सकाळच्या मार्केट प्री-ओपिंग सेशनमध्येच दिसून आली. लोकसभा निकालापुर्वी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळाले आहे. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने 3051 अंकांची तर निफ्टीनेही 870 अंकांनी उसळी घेतली.
शेअर बाजार चालू होताच सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची उसळी
प्री-ओपनिंग सेशनमध्ये दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार चालू झाल्यामुळेदेखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीत तेजी पाहायला मिळाली. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट 2200 पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट 23,337.9 अंकापर्यंत वधारला. सेन्सेक्सने 76,738.89 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.
शेअर मार्केटमधील तेजीचं नेमकं कारण काय?
लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्थिरता आहे. गुंतवणूकदार खबरदारी घेऊनच पैसे गुंतवत आहेत. असे असतानाच 1 जून रोजी एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. या आकड्यांत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच कारणामुळे सध्या शेअर बाजारात निफ्टी, सेन्सेक्स सकारात्मक दिसत आहेत. देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.
4 जून रोजी काय होणार?
4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. राज्यात मोदींचे सरकार पुन्हा आल्यास शेअर बाजार उसळण्याची शक्यता आहे. तर देशात सत्तांतर झाल्यास हाच निर्देशांक गडगडू शकतो. त्यामुळे 4 जून रोजी नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
पैसे ठेवा रेडी! 'हे' तीन आयपीओ तुम्हाला करू शकतात मालामाल!
जून महिन्यात बदललेले 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड!
एक्झिट पोलचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडतो? 20 वर्षांचा इतिहास काय सांगतो?