(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल अंबानी यांची 'ही' कंपनी सुस्साट, दोन आठवड्यांपासून देतेय जबरदस्त रिटर्न्स, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस!
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स पॉवर ही कंपनी शेअर बाजारावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. शुक्रवारी हा शेअर जवळपास पाच टक्क्यांनी वाढला.
मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर ही कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीला गेल्या दोन आठवड्यांपासून सलग अपर सर्किट लागत आहे. म्हणजेच गेल्या दोन आठवड्यांपासून या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न्स मिळत आहेत. भविष्यातही ही कंपनी अशीच प्रगती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी एकूण 4.98 टक्क्यांची तेजी
काही दिवसांपूर्वीच अनिल अंबनी यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीने कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासून या कंपनीचा शेअर चांगलाच तेजीत आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरचे मूल्य सलग वाढताना दिसत आहे. गेल्या आठ सत्रांत या शेअरला सलग अपर सर्किट लागत आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये एकूण 4.98 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सध्या या शेअरचे मूल्य 46.36 रुपये आहे.
कंपनीला उभे करायचे आहे भांडवल
कर्जमुक्त झाल्यानंतर आता रिलायन्स पॉवर ही कंपनी स्वत:चा विस्तार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी ही कंपनी भांडवल उभं करण्याचे नियोजन करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार रिलायन्स पॉवर या कंपनीच्या संचालक मंडळाची येत्या 3 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत भांडवल उभं करण्याच्या दृष्टीने इक्विटी सेल म्हणजे शेअरची विक्री आणि फॉरेन करन्सी कन्हर्टिबल बाँड यांच्या माध्यमातून पैसे उभे करण्यावर चर्चा आणि विचार होणार आहे.
कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नाही
या कंपनीने नुकतेच 1,525 कोटी रुपये म्हणजेच 18.3 कोटी डॉलर्स जमवण्यास मंजुरी दिलेली आहे. प्रिफरेन्शियल अलॉटमेंटच्या माध्यमातून हा निधी उभारला जाणार आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या या कंपनीने एकूण 3,872 कोटी रुपयांची थकबाकी दिलेली आहे. या कंपनीवर बँका तसेच वित्तीय संस्थांचे कर्ज नाही.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात भांडवली बाजार नियामक सेबीने अनिल अंबानी यांच्यावर कठोर कारवाई केली होती. अनिल अंबानी यांनी सिक्योरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांच्यावर सेबीने कोट्यवधी रुपयांचा दंडही ठोठावला होता. अनिल अंबानी यांच्यावर कारवाई झालेली असली तरी गेल्या आठ दिवसांपासून रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागत आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पुढचा आठवडा ठरणार खास! तीन ब्रँड आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार; पैसे कमवण्याची जबरदस्त संधी!