Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा जोर; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला
Share Market Opening : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण दिसून आली.
Share Market Opening : शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचे सत्र अजूनही सुरू आहे. गुरुवारी बाजारात झालेली घसरण आज शुक्रवारी कायम राहिल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. शेअर बाजार आजही अस्थिर राहण्याचे संकेत दिसून येत आहेत.
आज बाजार सुरू झाला तेव्हा बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 313.80 अंकांनी म्हणजे जवळपास 0.61 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 51,181 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी 87.95 अंक म्हणजे 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 15,272.65 खुला झाला.
आज शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच निफ्टी 15 मिनिटात 100 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये 106.45 अंकांची घसरण होऊन 15,254 अंकांवर आला आहे. निफ्टी 50 मधील आठ शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. तरस, 42 शेअर्समध्ये विक्री सुरू असल्याने घसरण दिसून येत आहे.
बँक निफ्टीमध्ये 218.95 अंकांची घसरण दिसून येत असून निर्देशांक 32,398 अंकांवर व्यवहार करत आहे.
मेटल क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये विक्रीचा जोर आहे. फार्मा क्षेत्रात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात 1.96 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर दरात 1.5 टक्क्यांच्या आसपास घसरण झाली आहे. मीडिया, रिअल्टी, पीएसयू बँक, ऑटो आणि वित्तीय सेवांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे.
गुरुवारी बाजारात घसरण
गुरुवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,045 अंकांनी, तर निफ्टी हा 331 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 2.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,479 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 2.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,571 अंकांवर स्थिरावला होता. निफ्टी हा गेल्या 52 आठवड्यातील नीचांकी पातळीवर घसरला. देशातील वाढती महागाई, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक आणि अमेरिकेतील फेडने वाढवलेले व्याजदर, या सर्वांचा एकत्रित परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.