Share Market Opening Bell : शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले
Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली असली तरी बाजारात अस्थिरता राहण्याचे संकेत आहेत.
Share Market Opening Bell : मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मकपणे झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 57,312 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 17,025.55 अंकांवर खुला झाला. बाजारात खरेदीचे संकेत दिसून येत असले तरी बाजार अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आज सकाळी, 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) 270 अंकांनी वधारत 57,419.26 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी निर्देशांक (Nifty) 80 अंकांच्या तेजीसह 17,063.70 अंकांवर व्यवहार करत आहे.
आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने 2023 या वर्षासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2.7 टक्के इतका केला आहे. आधीच्या अंदाजापेक्षा हा अंदाज कमी आहे. त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसून आला. आशियाई बाजारात जपानचा शेअर बाजार निक्केईमध्ये 0.06 टक्के, दक्षिण कोरियाचा निर्देशांक कोस्पीमध्ये 0.09 टक्के आणि चीनच्या शांघाई कंपोजिट इंडेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात मंगळवारी, अस्थिरता दिसून आली होती. अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाउ जोन्स निर्देशांक 36 अंकांनी वधारत 29,239 अंकावर स्थिरावला. तर, एस अॅण्ड पी 500 निर्देशांक 24 अंकांच्या घसरणीसह 3,688 अंकांवर स्थिरावला.
'शेअर इंडिया' संस्थेचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, वित्तीय सेवा, बँक, फार्मा आणि ऊर्जा क्षेत्रात आज खरेदी दिसून येऊ शकते. तर, रियल्टी, मेटल, मीडिया, आयटी, एफएमसीजी आणि मिड-कॅप सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसू शकतो.
मंगळवारी बाजार घसरला
मंगळवारी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्समध्ये 843 अंकांची घसरण होऊन 57,147 अंकावर बंद झाला. तर, निफ्टी 257 अंकांच्या घसरणीसह 16,983 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीतही 380 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 38,712 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना एकूण 1036 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2291 कंपन्यांचे शेअर्स घसरले. 133 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल नोंदवण्याता आला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: