Share Market Updates : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 250 अंकानी वधारला
Share Market Updates : शेअर बाजारात आज तेजी दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले आहेत
Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवसात शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले आहेत. सेन्सेक्स 252.85 अंकांनी वधारत 57,823.10 अंकावर खुला झाला. तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक 84.95 अंकांनी वधारत 17,243.20 खुला झाला. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे.
आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 180 अंकांनी वधारून 57,750.34 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 69 अंकांनी वधारत 17,227.50 अंकावर व्यवहार करत होता. आज सकाळच्या सत्रात निफ्टीत खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टी 50 मधील 33 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर, उर्वरित 17 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टी 26.6 अंकांनी वधारला असून 37,518 अंकांवर व्यवहार करत आहे.
सेक्टोरियल इंडेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी, एफएमसीजी आणि आयटी सेक्टर वगळता इतर सर्व निर्देशांकांत तेजी दिसत आहे. मीडिया क्षेत्रातील शेअर 1.33 टक्क्यांनी वधारला आहे. तर, मेटल आणि फार्मा शेअरमध्येही तेजी दिसत आहे. सेन्सेक्समधील शेअरमध्ये भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड. अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज फायनान्सदेखील तेजीत दिसत आहेत.
सन फार्माच्या शेअर दरात 2.17 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, ब्रिटानियाच्या शेअर दरात 0.90 टक्के, इंडसइंड बँकेत 0.62 टक्क्यांची घसरण झाली आहे. एचडीएफसी लाइफच्या शेअर दरात 0.56 टक्के, टीसीएसमध्ये 0.47 टक्क्यांची घसरण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारीदेखील बाजारात खरेदीचा जोर दिसला. सेन्सेक्स निर्देशांक 712 अंकांनी वधारून 57,570 वर बंद झाला तर निफ्टी 228 अंकांच्या तेजीसह 17,158 अंकांवर स्थिरावला.
FPI कडून खरेदी
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) सलग नऊ महिने विक्री केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात परतले आहेत. जुलैमध्ये एफपीआयने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डॉलर निर्देशांकातील नरमाई आणि कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालानंतर एफपीआय पुन्हा एकदा खरेदीदार बनले आहेत. यापूर्वी जूनमध्ये एफपीआयने शेअर्समधून 50,145 कोटी रुपये काढले होते. मार्च 2020 नंतर एका महिन्यात काढलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. त्यावेळी FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 61,973 कोटी रुपये काढले होते.