शेअर्सची किंमत 10 रुपयांहून कमी, परतावा 1,000 टक्क्याहून जास्त, गुंतवणूकदार झाले मालामाल; 'हे' आहेत या वर्षातले टॉप 7 पेनी स्टॉक्स
Penny Stocks: कॅसर कॉर्पोरेशन, अलायन्स इंटिग्रेडेट मेटालिक्स, हेमंग रिसोर्से, केबीएस इंडियासह सात शेअर्सनी गुंतवणूकदारांना तब्बल एक हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
मुंबई: आरबीआयने केलेल्या व्याजदरात वाढ आणि भू-राजनितीक तणावांमुळे यंदाचं वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी काहीसं अस्थिर आणि चढ-उताराचं ठरलं. पण या दरम्यान काही असे पेनी स्टॉक्स आहेत कि ज्यांनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे. यातील बहुतांश स्टॉक्सची नावंही अनेकांनी ऐकली नसतील.
What is Penny Stocks: पेनी स्टॉक्स म्हणजे काय?
शेअर बाजारामध्ये ज्या शेअर्सची किंमत 10 रुपये किंवा त्याहून कमी असेल त्यांना पेनी स्टॉक्स म्हणतात. गुंतवणूकदारांसाठी हे स्टॉक्स सर्वाधिक रिस्क असलेले स्टॉक्स समजले जातात.
शेअर बाजारातील प्रमुख इंडेक्स असलेल्या बीएसई इंडेक्स (BSE Index) आणि निफ्टी-50 (Nifty-50) मध्ये यंदाच्या वर्षात जवळपास सात टक्के तेजी आल्याचं दिसून आलं. पण काही स्टॉक्समध्ये 1000 टक्क्यांहून अधिक तेजी आल्याचं स्पष्ट झालंय. ते सात स्टॉक्स पुढीलप्रमाणे,
1. केसर कॉर्पोरेशन (Kaiser Corporation)
केसर कॉर्पोरेशनचा हा स्टॉक्स सर्वाधिक मोठ्या मल्टिबॅगर शेअर्सपैकी एक आहे. या शेअर्समध्ये यंदाच्या वर्षात 1,959 टक्क्यांनी तेजी आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे जानेवारी 2022 मध्ये या स्टॉक्सची किंमत 2.80 पैसे इतकी होती. आता या शेअर्सची किंमत 57 रुपये इतकी झाली आहे.
2. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स (Alliance Integrated Metaliks)
जानेवारी 2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत ही 2.71 रुपये होती. आता ही किंमत वाढून 45 रुपये झाली आहे. 2022 मध्ये या शेअर्सच्या किमतीमध्ये 1,578 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
3. हेमांग रिसोर्सेस (Hemang Resources)
जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत ही 3.09 इतकी होती. आता याच्या एका शेअरची किंमत ही 53 रुपये इतकी झाली आहे. एकाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 1,612 टक्क्यांनी परतावा दिला आहे.
4. केबीएस इंडिया (KBS India Stock)
केबीएस इंडिया ही कंपनी वेल्थ मॅनेजमेंटशी संबंधित काम करते. त्यामध्ये स्टॉक मार्केटशी संबंधित गुंतवणूक आणि योजनांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये याच्या एका शेअरची किंमत ही 9.50 रुपये इतकी होती. आता त्यामध्ये 1,378 टक्क्यांनी वाढ झाली असून एका शेअरची किंमत ही 141 रुपये इतकी झाली आहे.
5. सोनल अॅडेहेसिव्ह (Sonal Adhesives)
या स्टॉकच्या किमतीत एका वर्षात 1,359 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये याच्या एका शेअरची किंमत ही 9.30 रुपये इतकी होती. आता त्याची किंमत 136 रुपयांवर पोहोचली आहे.
6. बीके निर्यात (Beekay Niryat)
या शेअरने गुंतवणूकदारांना 1,000 टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे. जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही 7 रुपये होती, आता त्याची किंमत 80 रुपये इतकी झाली आहे.
7. अश्निशा इंडस्ट्रिज (Ashnisha Industries)
जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही 0.96 रुपये इतकी होती. आज या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही 10 रुपये इतकी आहे. एकाच वर्षी या शेअरने 1000 टक्क्यांनी अधिक परतावा दिला आहे.