Share Market Closing Bell : आयटीतील खरेदीने बाजार सावरला; सेन्सेक्स 104 अंकांनी वधारला
Share Market Closing Bell : सकाळी खरेदीचा जोर असलेल्या शेअर बाजारात दुपारी नफा वसुली दिसून आली.
Share Market Closing Bell :आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसला. आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये (IT Sector) चांगली खरेदी झाली. आज बाजार सुरू झाला तेव्हा बाजार चांगला वधारला होता. मात्र, काही वेळेनंतर नफावसुली दिसून आली. आज शेअर बाजारातील (Share Market) व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 104 अंकांनी वधारला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 34 अंकांनी वधारला असल्याचे दिसून आले. सेन्सेक्स निर्देशांक 59,793 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 17,833 अंकांवर स्थिरावला.
आज सेन्सेक्सने 326 अंकांची तर निफ्टीने 127 अंकांची उसळी घेतली होती. त्यानंतर सुरू झालेल्या नफावसुलीने बाजारात घसरण दिसून आली. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता.
बँक निफ्टी आणि निफ्टी आयटीमध्ये तेजी दिसून आली. बँक निफ्टीतील 12 पैकी 9 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, तीन कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी आयटीतील सर्व 10 कंपन्यांच्या शेअर दरात उसळण दिसून आली. बँक, आयटी क्षेत्राशिवाय, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, ग्राहकोपयोगी वस्तू, फार्माशिवाय मीडिया क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण दिसून आली.
मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये तेजी दिसली. निफ्टीतील 50 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 24 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, 16 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज टेक महिंद्रा 3.32 टक्के, इंडसइंड बँक 2.60 टक्के, इन्फोसिसच्या शेअर दरात 2.43 टक्के, एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.90 टक्क्यांनी वाढ झाली.
दरम्यान, शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 357.53 अंकांनी वधारत 60,045 अंकांवर खुला झाला होता. एनएसईचा निफ्टी 124.60 अंकांनी वधारत 17,923 अंकांवर खुला झाला. सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर नफा वसुलीचे संकेत दिसून आले. त्यानंतर घसरण सुरू झाली. त्यामुळे सेन्सेक्स निर्देशांक 60 हजार अंकांच्या खाली आला. तर, निफ्टीने 17,925 अंकांची पातळी ओलांडली होती. मात्र, निफ्टीही घसरला.
इतर महत्त्वाची बातमी: