Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता, रशिया-अमेरिका वादाचा फटका, जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम
Crude Oil Prices: रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव कायम आहे. यामुळं तज्ज्ञांच्या मते क्रूड ऑईलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

Crude Oil Prices नवी दिल्ली : रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असल्याचं चित्र आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानं तेलाच्या जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. ऑईल मार्केट एक्सपर्टसनं एएनआयशी संवाद साधताना म्हटलं की येत्या काही महिन्यांमध्ये ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात वाढ होऊन ते 80 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात. भूराजकीय जोखीम वाढल्यानं तेलाच्या दरांवर दबाव वाढू शकतो.
वेंचुरामधील कमोडिटीज आणि सीआरएम हेड एन एस रामास्वामी यांनी म्हटलं की ब्रेंट ऑईलचे दर ऑक्टोबर दरम्या 72.07 डॉलरवरुन 76 डॉलरवर पोहोचू शकतात. 2025 च्या शेवटी हे दर 80-82 डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला यूक्रेन सोबतचं युद्ध थांबवण्यासाठी 10-12 दिवसांचा वेळ दिला आहे. जर रशियानं युद्ध थांबवलं नाही तर रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका अतिरिक्त निर्बंध लादणार असून 100 टक्के दुय्यम टॅरिफ लादणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळं रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणाऱ्या देशांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कमी दरानं कच्चे तेल खरेदी करावे अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या मोठ्या दंडाचा आणि टॅरिपचा सामना करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वेस्ट टेक्सास इंटरमिजीएटनं सप्टेंबरमध्ये क्रूड ऑईलचा दर 69.65 डॉलरवरुन 73 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
2025 च्या अखेरपर्यंत 76-79 डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतात. क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यास ते 65 डॉलर्सं पर्यंत येऊ शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या घडामोडींमुळं जागतिक तेल बाजारात उलटफेर होऊ शकतात. उत्पादन क्षमता कमी झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं 2026 पर्यंत तेलाच्या किमती वाढू शकतात.
नरेंद्र तनेजा यांनी एएनआयसोबत बोलताना म्हटलं की रशिया दररोज ग्लोबल ऑईल सप्लाय सिस्टीममध्ये 50 लाख बॅरल तेल निर्यात करतो. जर रशिया यातून बाहेर गेलं तर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 100 ते 120 डॉलर प्रति बॅरल पेक्षा जास्त असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.


















