Rupee Weakens Against Dollar: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची मोठी किंमत भारताला मोजावी लागत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 77 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. अमेरिका आणि त्याच्या युरोपीय मित्र देशांनी रशियन तेलावर निर्बंध लादल्याच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली. ज्यामुळे रुपया सोमवारी सुमारे 77 प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर घसरला. रुपया कमकुवत होण्याची ही चौथी वेळ आहे. देशांतर्गत चलन बाजारात रुपया प्रति डॉलर 76.96 वर नीचांक पातळीवर पोहोचला आहे.  


डॉलर महाग झाल्याने हे होणार परिणाम 


1. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा इंधनाचा वापर करणारा देश आहे. ज्याची 80 टक्के पूर्तता आयातीतून होते. सरकारी तेल कंपन्या डॉलरमध्ये पैसे देऊन कच्चे तेल खरेदी करतात. जर डॉलर महाग झाला आणि रुपया स्वस्त झाला, तर आपल्याला डॉलर घेण्यासाठी आणखी रुपये मोजावे लागतील. यामुळे आयात महाग होणार असून सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार.


2. भारतातील लाखो मुले परदेशात शिकत आहेत, ज्यांचे पालक फी पासून ते राहणीमानाचा खर्च भरत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च महाग होईल. कारण पालकांना जास्त पैसे देऊन डॉलर्स विकत घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांना महागाईचा झटका बसणार आहे.


3. खाद्यतेल आधीच महाग आहे, आपल्या देशात आयातीद्वारे याची पूर्तता केली जाते. डॉलर महाग झाल्यास खाद्यतेलाच्या किंमत आणखीन वाढ होईल.


4. परदेश प्रवास महाग होईल. ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांना डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.


आरबीआयने विकले डॉलर


जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतीय चलनावर दबाव वाढला आहे. रुपयाला कमजोर होण्यापासून वाचवण्यासाठी आरबीआयने डॉलर विकण्याचे काम सुरू केले आहे. रुपयाची वाढती घसरण पाहता आरबीआयने मोठा निर्णय घेत परकीय चलन निधीतून 2 अब्ज डॉलर्स विकले. जेणेकरून आयात करणाऱ्या कंपन्यांना महागडे डॉलर खरेदी करावे लागणार नाहीत. पण कच्च्या तेलाची किंमत 14 वर्षांच्या सर्वाधिक उच्चांकावर पोहोचत 140 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ गेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :