Mumbai Bank :  मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अडचणीत येण्याची शक्यता आहे.  दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे राज्याच्या सहकार खात्याचे आदेश दिले आहेत. बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.


धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले होते. मुंबै बँकेने या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केलेले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. हे कर्ज वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष होते.


प्रवीण दरेकर यांनी फेटाळले आरोप 


दरम्यान यासंबंधी एबीपी माझानं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरेकरांनी म्हटलं की,  सुरेश धस यांच्या उद्योगांना सर्व कागदपत्रे तपासून नियमानुसार कर्ज वाटप केले आहे. सरकारने हवी ती चौकशी करावी, यामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी झालेल्या नाहीत. राज्य सरकार केवळ राजकीय आकसातून कारवाई करत आहे, असं दरेकर म्हणाले. सुरेश धस यांच्या प्रतिस्पर्धी आमदारांनी आकसातून ही तक्रार दिली आहे. या गोष्टीची रीतसर उत्तरं दिली जातील, असं ते म्हणाले. हे आता रुटीन झालं आहे, अशा नोटिसा आता येतच असतात. सुरेश धस त्यांची बाजू सांगतील. काही अडचण नाही, असं दरेकर म्हणाले.