UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात 54 जागांवर 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. योगी सरकारमधील 7 मंत्र्याची प्रतिष्ठा लागली आहे. देशातील पाच राज्यापैकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 54 जागांवर मतदान होत असून, 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यात नक्षलग्रस्त चकिया, दूधी आणि रॉबर्टसगंज जागांवरही मतदान होणार आहे. या जागांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे या जागांवर मतदानाच्या 48 तास अगोदर शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरू होता. इतर जागांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरु होता.


अंतिम फेरीत किती उमेदवार आणि किती मतदार?


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांनी जोरदार प्रचार केला. सातव्या टप्प्यासाठी एकूण 2 कोटी 6 लाख मतदार आहेत. यामध्ये 1 कोटी 10 लाख पुरुष आणि 96 लाख महिला मतदार आहेत. या फेरीत 1 हजार 17 तृतीयपंथी मतदारही आहेत. हे मतदार 613 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत आझमगड, वाराणसी आणि विंध्याचल मंडलातील 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र जिल्ह्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या या 54 जागांपैकी 2017 च्या निवडणुकीत भाजपने 29 जागा  जिंकल्या होत्या. तर 11 जागा समाजवादी पार्टीने, 6 जागा बसपाने, आणि निषाद पार्टीने एक जागा जिंकली होती.


योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 


या टप्प्यात योगी आदित्यनाथ सरकारच्या 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर, मुद्रांक आणि नोंदणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रवींद्र जैस्वाल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र प्रभार) नीलकंठ तिवारी, गृहनिर्माण आणि नगर नियोजन मंत्री गिरीश यादव, ऊर्जा राज्यमंत्री रमाशंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. तसेच सहकार राज्यमंत्री संगीता यादव बळवंत, राज्यमंत्री संजीव गोंड सोनभद्र, वन व पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.