Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची रिलायन्स देणार डी-मार्टला टक्कर; 'ही' कंपनी विकत घेणार
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी हे आता लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. ही कंपनी ताब्यात आल्यानंतर रिलायन्स डी-मार्टला टक्कर देणार आहे.
Mukesh Ambani Reliance: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. रिलायन्स (Reliance) आणि जर्मन रिटेलर कॅश अँड कॅरी बिझनेसमधील (METRO AG's Cash & Carry business) खरेदी करार जवळपास निश्चित झाला आहे. एका वृत्तानुसार, 28 डिसेंबर रोजी रिलायन्स या कंपनीचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची 28 डिसेंबर रोजी जयंती आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार 500 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 4060 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'मेट्रो' कंपनी खरेदी केल्यानंतर 'रिलायन्स रिटेल'ची डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.
मेट्रो कंपनी खरेदी झाल्यानंतर त्यांचे 31 स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टि ब्रॅण्ड रिटेल चेन तयार करण्यात येणार आहे. मेट्रोची भारतातील 31 घाऊक वितरण केंद्रे तसेच लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची होतील. मेट्रोची भारतातील 31 घाऊक वितरण केंद्रे तसेच लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची असतील. मेट्रोचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरच्या घरात आहे.
रिलायन्स उद्योग समूहाकडून रिटेल क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. बिग बाजारसोबत त्यांनी करार केला. रिटेल क्षेत्रात उतरण्याच्या दृष्टीने रिलायन्सकडून एफएमसीजी सेक्टरमधील काही छोट्या कंपन्यादेखील खरेदी करण्यात येत आहेत. कॅम्पाकोला ही जुनी शीतपेय कंपनीदेखील रिलायन्सने खरेदी केली आहे. त्याशिवाय, रिलायन्स सध्या गार्डन नमकीन (Garden Namkeens), लाहौरी जिरा (Lahori Zeera) आणि बिंदू बेव्हरेज (Bindu Beverages) या कंपन्या खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स रिटेल FMCG क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. भारतीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील अशा उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तूंचे किफायती दरात उत्पादन करणे आणि वितरण करण्याचे उद्दिष्ट रिलायन्स कंपनीने ठेवले आहे
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील आघाडीची कंपनी आहे. रिलायन्स एकूण मूल्य 17.25 लाख कोटी रुपये इतके आहे. रिलायन्स समूहातील टॉप-10 कंपन्यांचे मूल्य हे 72 लाख कोटी रुपये आहे. यातील रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा जवळपास 25 टक्के आहे.