Narendra Modi : अटल सेतू, अयोध्या राम मंदिरानंतर आणखी एक मोठा प्रकल्प देशाच्या सेवेत, दोन मार्ग जोडणाऱ्या रेल्वे लिंकला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येत आहे. या आधी मुंबईतील अटल सेतूचे लोकार्पणही करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते मुंबईतील अटल सेतू आणि अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आता या उद्घाटनाची मालिका सुरूच असून गुरुवारी अशाच आणखी एका प्रकल्पाला मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना होणारा विलंब दूर होईल आणि देशातील लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय घट होईल. देशातील ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) ला जोडणाऱ्या इलेक्ट्रिक दुहेरी रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी उद्घाटन करणार आहेत. ही रेल्वे लिंक न्यू खुर्जा जंक्शन ते रेवाडी रेल्वे स्थानकाला जोडणार आहे.
173 किलोमीटर लांबीची रेल्वेलिंक
देशातील दोन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला (DFC) जोडणारी ही रेल्वे लिंक 173 किलोमीटर लांब आहे. यासाठी 10,141 कोटी रुपये खर्च आला आहे. ती नोएडातील न्यू बोराकी येथून सुरू होईल आणि या मार्गावर न्यू दादरी, न्यू फरिदाबाद, न्यू पृथला, न्यू तवाडू आणि न्यू धारुहेरा अशी सहा स्थानके असतील.
मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ कमी होईल
दोन्ही डीएफसी या रेल्वे लिंकद्वारे जोडल्या जातील, ज्यामुळे माल गाड्यांच्या वाहतुकीत लागणारा वेळ कमी होईल. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल. एवढेच नाही तर खुर्जा ते रेवाडी दरम्यान लागणारा वेळ 20 तासांनी कमी होईल. डीएफसीच्या निर्मितीनंतर देशातील मालगाड्यांना गाझियाबाद आणि दिल्लीच्या गजबजलेल्या एनसीआर भागातून जावे लागणार नाही.
या भागावर एक किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे बोगदाही बांधण्यात आला आहे. जगातील हा अशा प्रकारचा पहिला बोगदा आहे. या बोगद्यातून डबल डेकर कंटेनरही सहज जाऊ शकतात. हा रेल्वे दुवा दादरी येथे 4.54 किमी लांबीच्या रेल्वे उड्डाणपुलाद्वारे (RFO) DFC ला भारतीय रेल्वेशी जोडतो.
याआधी पंतप्रधान मोदींनी जानेवारीच्या सुरुवातीला देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील अटल सेतूचेही उद्घाटन केलं होतं. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ दोन तासांवरून केवळ 20 मिनिटांवर आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील उत्तर-दक्षिण ते पूर्व ते पश्चिम प्रवासाची पद्धतही बदलली आहे. ते देशात बांधल्या जात असलेल्या 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे कॉरिडॉर'शी जोडलेले आहे, ज्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल.
ही बातमी वाचा: