Mutual Fund : बाजारातील अनिश्चिचततेमुळं गुंतवणूकदार सतर्क, इक्विटी म्युच्यअल फंडमधील गुंतवणूक तब्बल 21 टक्क्यांनी घटली
Mutual Fund : म्युच्युअल फंडच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक मे महिन्यात तब्बल 21 टक्क्यांनी घटली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळं हे घडल्याचं जाणकारांचं मत आहे.

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेक जण एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. गेल्या काही दिवसांपासून म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्याय ठरला आहे. मात्र, मे महिन्याची आकडेवारी समोर येताच नवीन बाब समोर आली आहे. ती म्हणजेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली आहे. ही घट देखील मोठी आहे. जवळपास 21.7 टक्के घट झाली आहे.
म्युच्युअल फंडच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक 13 महिन्यांच्या निचांकी पातळीवर आली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत ही घट 21.7 टक्के आहे. मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये 19013 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जी एप्रिल महिन्यात24269 कोटी रुपये होती. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाकडून देण्यात आली आहे.मार्च महिन्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. त्यामुळं गुंतवणूकदारांनी सतर्क होत गुंतवणुकीचे अन्य पर्याय स्वीकारल्याचं दिसून येतं.
म्युच्युअल फंडद्वारे असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम एप्रिल महिन्यातील 70 लाख कोटींवरुन 72.2 लाख कोटींवर पोहोचली आहे. मल्टी कॅप, सेक्टर थिमॅटिक फंडमधील गुंतवणूक देखील वाढली आहे. तर, लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणूक घडली आहे.
मल्टीकॅप म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 2552 कोटींवरुन 2999 कोटी रुपयांपर्यंत वाढली. तर, लार्जकॅपमधील गुंतवणूक एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये 53.2 टक्क्यांनी घटली. लार्ज कॅप म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 2671 कोटींवरुन 1250 कोटी रुपयांवर आली आहे. मिडकॅप फंडमधील गुंतवणूक 3314 कोटी रुपयांवरुन 2809 कोटींपर्यंत आली. मिडकॅपमध्ये जवळपास 15 टक्के घट झाली.
स्मॉलकॅप फंडमध्ये देखील घसरण पाहयला मिळाली. स्मॉलकॅप फंडमधील गुंतवणूक 4000 कोटींवरुन 3214 कोटी रुपयांपर्यंत आली आहे. ही घट 19.6 टक्के इतकी आहे.
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत बदल झाला त्याचा परिणाम इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर दिसून आला. या काळात हायब्रीडआणि आर्बिट्रेज योजनांकडे गुंतवणूक वाढते, असं एम्फीचे चीफ एक्झ्युकेटिव्ह वेंकट चालसानी यांनी म्हटलं.
दरम्यान, इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जरी घटली असली तरी एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक मात्र वाढली आहे. एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये किंवा इतर योजनांमध्ये गुंतवता येते.

























