MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
MSSC : केंद्र सरकारनं 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आणली होती. या योजनेत मार्च 2025 पर्यंत खाती उघडता येणार आहेत.
नवी दिल्ली : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक अफेअर्स या विभागातर्फे चालवली जाते. ही योजना भारतातील मुली आणि महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरु करण्यात आली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी क्षेत्रातील बँकांना या योजनेत ठेवी स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा अर्ज पोस्ट ऑफिस आणि शेड्यूल बँकांमध्ये देखील करता येऊ शकतो. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. या योजनेत 1000 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
तरुणी आणि महिलांना गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत 31 मार्च 2025 पूर्वी खातं उघडता येईल. या खात्याचा कालावधी 2 वर्ष असेल. या योजनेती ठेवींवर 7.5 टक्के व्याज मिळेल, त्यामध्ये प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीनं वाढेल. यातील ठेव दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. दोन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी यातून 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करणारी महिला भारतीय नागरिक असावी. महिला आणि मुलींसाठी अर्ज करता येईल. या योजनेत महिलांना 2 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कितीही खाती काढता येतील. मात्र, त्यासाठी तीन महिन्यांचा कालावाधी दोन्ही खात्यांमध्ये असावा. किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.महिला बचत सन्मान प्रमाणपत्र यामध्ये 2 लाख रुपये गुंतवता येतील.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र काढल्यानंतर पुढील दोन वर्ष हा या योजनेचा कालावधी असेल. दोन वर्षानंतर 7.5 टक्क्यांप्रमाणं व्याज मिळेल. याशिवाय एका वर्षानंतर किमान 40 टक्के रक्कम देखील काढून घेता येऊ शकते.
पोस्ट ऑफिस किंवा बँकेत या योजनेचे अर्ज दाखल करता येतील. या योजनेच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करुन त्याच्या प्रिंटसह सर्व कागदपत्र जोडून स्वयंघोषणापत्रासह आणि वारसांच्या नोंदीसह अर्ज द्यावेत. या योजनेत जितकी रक्कम गुंतवणूकर आहे ती जमा करावी.त्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र घ्यावं.
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा मृत्यू झाल्यास ते खाते कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बंद केलं जाईल. याशिवाय खातेदाराची वैद्यकीय स्थिती खराब असल्यानं त्याला पैशांची गरज असल्याची खात्री झाल्यास पोस्ट ऑफिस आणि बँक याबाबत निर्णय़ घेऊ शकते. या योजनेसाठी पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा, जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पैसे जमा करण्याची स्लीप किंवा चेक, पत्त्याचा पुरावा यासाठी पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान कार्ड, जॉब कार्ड किंवा राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचं पत्र ज्यावर नाव आणि पत्ता असेल ते सादर करावे लागेल.
या योजनेत ज्या महिला 2 लाख रुपयांची गुंतवणूक करतील त्यांना 7.5 टक्के व्याज दरानं 32044 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दोन वर्षांनी एकूण 232044 रुपये मिळतील. दीड लाख रुपयांची गुंतवणूक असेल त्यांना 24033 रुपये व्याज म्हणून मिळतील.एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 16022 रुपये व्याज म्हणून मिळतील. याशिवाय 50 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना 8011 रुपये व्याज मिळेल.
इतर बातम्या :