Mahadev App and Dabur : महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष
Mahadev App Scam and Dabur : महादेव अॅप घोटाळा प्रकरणी डाबर कंपनीच्या संचालकांचे नाव एफआयआरमध्ये आल्याने खळबळ उडाली. कंपनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई : महादेव सट्टेबाजी अॅप घोटाळ्याची (Mahadev App Scam) धग आता वाढत आहे. राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनंतर आता या घोटाळ्याचा संबंध थेट डाबर ग्रुपशी (Dabur Group) असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) रडारवर डाबर ग्रुपचे (Dabur Group) अध्यक्ष मोहित व्ही. बर्मन आणि संचालक गौरव व्ही. बर्मनही आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे डाबर कंपनीने याबाबतच्या वृत्तावर भूमिकाही स्पष्ट केली आहे.
मुंबई पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या बेटिंग अॅप एफआयआरमध्ये या ग्रुपचे मोहित बर्मन आणि गौरव बर्मन नाव आहे. यामध्ये आतापर्यंत 31 आरोपींचा समावेश करण्यात आला असून त्यात बॉलिवूड अभिनेता साहिल खान आणि इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.
एफआयआरमध्ये 'डाबर'च्या संचालकांची नावे
माटुंगा पोलिसांनी साहिल खान, गौरव बर्मन, मोहित बर्मन आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलम 420,465,467,468,471,120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. गौरव बर्मन आणि मोहित बर्मन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारदाराच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे, या सट्टेबाजीत दोघांचेही सहकार्य असल्याचे पोलिसांनी त्यांच्या एफआयआर कॉपीमध्ये नमूद केले आहे. आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल व इतरांना दर महिन्याला हवाला व्यवहारातून पैसे मिळत होते.
'डाबर' कंपनीने काय म्हटले?
मागील अनेक दशकांपासून भारतात आयुर्वेदिक उत्पादनांची विक्री करणारी कंपनी म्हणून डाबर समूहाचे नाव आहे. या डाबर कंपनीची धुरा ही बर्मन कुटुंबाकडे आहे. मुंबई पोलिसांनी मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त समोर येताच, डाबर कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कंपनीने म्हटले की, एफआयआरमधील माहिती, आरोप निखालस खोटे आहेत. मोहित बर्मन आणि गौरव बर्मन हे आरोपींना ओळखतही नाहीत किंवा त्यांना कधी भेटलेही नसल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बर्मन कुटुंबीयांकडून रेलिगेअर एंटरप्रायझेसमध्ये (Religare Enterprises) आपली हिस्सेदारी 21.24 टक्क्यापर्यंत वाढवली जात असताना, हे एफआयआरचे वृत्त समोर आले आहे. अशा प्रकारच्या एफआयआरमुळे व्यावसायिक निर्णयावर कोणताही परिणाम होणार नसून आम्ही पुढील वाटचाल करत आहोत.
मुंबईत तक्रार दाखल
माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीच्या आधारे माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह एकूण 31 हून अधिक जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते बनकर यांनी केला आहे. खिलाडी अॅपच्या माध्यमातून आरोपी जुगार व इतर खेळ खेळत होते. तसेच या अॅपच्या माध्यमातून ते अवैध कमाई करत होते.