LPG Cylinder: नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ, तुमच्या शहरांतील किमती काय?
LPG Cylinder: LPG सिलिंडरच्या किंमतीतील हा बदल आज 1 ऑगस्ट 2024 पासून देशभरात लागू झाला आहे. तुम्ही तुमच्या शहरांतील एलपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती येथे तपासू शकता...
LPG Cylinder Price : नवी दिल्ली : आज ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख. नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा (Inflation) तडका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. सरकारी तेल कंपन्या (Government Oil Companies) आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत बदल केला आहे. या बदलांमुळे सर्वांच्या खिशाला चाप बसणार आहे. आज 1 ऑगस्टपासून 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (Commercial Cylinder) महाग झाला आहेत. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींत सुमारे 8 ते 9 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आजपासून तुमच्या शहरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती काय?
एलपीजी सिलेंडरच्या नव्या दरांनुसार, दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून 1652.50 रुपये झाली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात किंमत 19 रुपयांनी कमी होऊन 1,646 रुपयांवर आली होती. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1,764.50 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. कोलकातामध्ये 8.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या मोठ्या सिलेंडरसाठी मुंबईतील लोकांना आता 1,605 रुपये मोजावे लागतील, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,817 रुपये असेल.
सलग 4 महिने किमतींत कपात
यापूर्वी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत सलग चार महिने कमी केली जात होती. गेल्या महिन्यात म्हणजेच, 1 जुलैपासून 19 किलोंच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती. जूनमध्ये 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी करण्यात आली होती. 1 मेपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींत 19 रुपयांची कपात करण्यात आली होती. एप्रिलपूर्वी सलग तीन महिने व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती.
घरगुती सिलेंडरच्या किमती जैसे थे
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतील शेवटचा बदल मार्चमध्ये झाला होता, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) एलपीजी सिलेंडरच्या किमतींत 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच, 7 मार्चला मोदी सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळानं 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 14 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, जवळपास 5 महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.