होळीपूर्वीच सर्वसामान्यांना मोठा झटका, आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ
सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. होळीच्या सणापूर्वीच LPG सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder Price) वाढ करुन सरकारनं सर्वसामान्यांना झटका दिलाय.
LPG Cylinder Price : सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. होळीच्या सणापूर्वीच LPG सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder Price) वाढ करुन सरकारनं सर्वसामान्यांना झटका दिलाय. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही वाढ आजपासून करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी करण्यात आली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. विविध शहरांमध्ये आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी महागली आहे. तर 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही सलग दुसरी वाढ आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दोनदा वाढ करण्यात आली आहे. होळीचा सण हा 24 आणि 25 मार्च रोजी देशभरात साजरा होणार आहे. त्यापूर्वीच सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही दरवाढ जाहीर केली आहे.
प्रमुख शहरांमध्ये LPG सिलिंडरचे नवीन दर काय?
दरम्यान, या वाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,795.00 रुपये झाली आहे. यापूर्वी ती 1,769.50 रुपयांना उपलब्ध होते. अशाप्रकारे दिल्लीतील किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1723.50 रुपयांवरुन 1749 रुपयांवर पोहोचली आहे. आता हा सिलेंडर कोलकातामध्ये 1911 रुपयांना मिळणार आहे. जो पूर्वी 1887 रुपयांना मिळत होता. चार मोठ्या शहरांमध्ये चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर सर्वात महाग आहेत. चेन्नईतील किंमत आता 1937 रुपयांवरुन 1960.50 रुपये झाली आहे.
सर्वात मोठी वाढ ही दिल्ली आणि मुंबईमध्ये झाली आहे. तिथे प्रति सिलेंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकात्यात 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 14 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा व्यावसायिक सिलिंडर महागले आहेत.
देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर
घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच 14 किलोच्या सिलेंडरबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये शेवटचा बदल 30 ऑगस्ट रोजी झाला होता. म्हणजेच 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 6 महिन्यांपासून स्थिर आहे. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये त्याची किंमत 918.50 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि कोलकातामध्ये 929 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या: