Prasol Chemicals : प्रासोल रासायनिक निर्मात्याचा IPO मंजूर, 800 कोटी रुपये उभारण्याचा मानस
Prasol Chemicals IPO : या आयपीओद्वारे उभारलेल्या निधीपैकी 160 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय, 30 कोटी रुपयांची रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरण्याची योजना आहे.
मुंबई : विशेष रासायनिक कंपनी प्रासोल केमिकल्सच्या आयपीओला (Prasol Chemicals IPO) बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. कंपनीला या आयपीओद्वारे 800 कोटी रुपये उभे करायचा कंपनीचा मानस आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, या आयपीओ अंतर्गत 250 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, विक्रीसाठी ऑफर (OFS) अंतर्गत विद्यमान भागधारकांद्वारे 90 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील.
प्रासोल केमिकल्सने एप्रिलमध्ये नियामकाकडे त्यांचे आयपीओ पेपर्स दाखल केले होते. कंपनीला 23 ऑगस्ट रोजी निरीक्षण पत्र प्राप्त झाले आहे. आयपीओ लाँच करण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला सेबीकडून निरीक्षण पत्र घेणे आवश्यक आहे. मसुद्याच्या कागदपत्रांनुसार, कंपनी 50 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या आणखी एका इश्यूवर विचार करू शकते. असे प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, नवीन इश्यूचा आकार कमी केला जाईल.
निधी कुठे वापरला जाईल
या आयपीओद्वारे उभारलेल्या निधीपैकी 160 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय, 30 कोटी रुपयांची रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरण्याची योजना आहे. हा निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील वापरला जाणार आहे. कंपनी या आयपीओद्वारे सुमारे 700-800 कोटी रुपये उभारू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कंपनीबद्दल सविस्तर माहिती
प्रसोल केमिकल्स ही एसीटोन आणि फॉस्फरस डेरिव्हेटिव्ह्जची भारतातील आघाडीची उत्पादक आहे. कंपनीने आपल्या व्यवसायाची आणि कामकाजाची व्याप्ती वाढवली आहे. अशाप्रकारे कंपनीने स्वत:ला एका छोट्या उत्पादक कंपनीपासून मोठ्या वैविध्यपूर्ण विशेष रासायनिक कंपनीत प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले अनेक एसीटोन आणि फॉस्फरस डेरिव्हेटिव्ह्ज औषधी, ऍग्रो केमिकल सक्रिय घटक आणि फॉर्म्युलेशनच्या संश्लेषणामध्ये वापरले जातात.
याव्यतिरिक्त, कंपनीची उत्पादने घरगुती आणि वैयक्तिक काळजी उत्पादने जसे की सनस्क्रीन, शैम्पू, फ्लेवर्स, सुगंध आणि जंतुनाशकांमध्ये एक महत्त्वाचा कच्चा माल म्हणून देखील वापरली जातात.
डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने 50.10 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. यासह, कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 25.08 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2020 मध्ये 37.77 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ऑपरेशनमधून त्याची कमाई 626.93 कोटी रुपये होती. त्याच वेळी, ते आर्थिक वर्ष 2021 मध्ये 595.54 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2020 मध्ये 531.24 कोटी रुपये होते. जेएम फायनान्शिअल आणि डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.