IRFC Share Price: फक्त 37 कर्मचारी असलेल्या रेल्वे कंपनीच्या 'या' शेअरमध्ये मोठी तेजी
IRFC Share Price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) शेअर दराने आतापर्यंत उच्चांक गाठला.
IRFC Share Price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. पहिल्यांदाच IRFC च्या शेअर दराने आयपीओहून अधिकचा दर गाठला आहे. IRFC मागील वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. कंपनीची स्थिती दमदार असतानाही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला नव्हता.
IRFC च्या शेअर दरात आज, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी तेजी दिसून आली. सकाळच्या वेळी IRFC च्या शेअर दरात 7.07 टक्क्यांची उसळण दिसून आली. IRFC ने सकाळी 28 रुपयांचा स्तर गाठला. सकाळी 28.65 रुपये प्रति शेअर दराचा उच्चांक गाठला होता. बाजार बंद होताना 3.53 टक्क्यांच्या तेजीसह IRFC चा शेअर दर 27.90 रुपयांवर स्थिरावला. IRFC च्या आयपीओत प्रति शेअर किंमत 25 ते 26 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती.
IRFC नेमकं करते काय?
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही भारतीय रेल्वेला निधी पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती. रेल्वे प्रकल्पांसाठी, विकासकामांसाठी देशातून आणि परदेशातून निधी जमवण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. वृत्तांनुसार, या कंपनीचा एनपीए शून्य आहे. रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांसाठी IRFC 45 ते 55 टक्क्यांपर्यंतचा निधी पुरवते. त्याशिवाय, IRFC अतिशय कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देते. सरकारच्या हमीच्या बदल्यात ही कंपनी रेल्वेला कर्ज देते.
फक्त 37 कर्मचारी आणि 41 हजार कोटींची उलाढाल
विविध अहवालांनुसार, वृत्तानुसार IRFC मध्ये फक्त 37 कर्मचारी काम करतात. मात्र, त्यांची आर्थिक उलाढाल 41 हजार कोटींहून अधिक आहे. सरकारकडून या कंपनीला सवलत मिळत असल्याने कर द्यावा लागत नाही. या कंपनीचा कामकाज दिल्लीतून चालवले जाते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये IRFC ची फंडिग कॉस्ट 6.42 टक्के इतकी होती.
IIFCL सोबत झाला होता करार
मागील महिन्यात IRFC ने इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (IIFCL) सोबत करार केला होता. वर्ष 2019-20 आणि 2020-22 च्या दरम्यान IIFCL चा महसूल 51 टक्क्यांनी वाढून 20,302 कोटी रुपयांहून वाढला. या कालावधीत कंपनीचा नफादेखील दुप्पटीने वाढून 20,302 कोटी इतका झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: