मुंबई : सध्या तंत्रज्ञानाचे जग आहे. आपल्या हातात असलेल्या मोबाईलवरून आपण आपली सर्व कामे करू शकतो. याच मोबाईलमुळे बँकिंग जगतातही मोठी प्रगती झाली आहे. लोक घरबसल्याच आता बँकेची सर्व कामे करतात. आता ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळण्याचीही सोय करून देण्यात आली आहे. मात्र याच ऑनलाईन पद्धतीने लोन मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकांची फसवणूक होते. ब्लॅकमेलिंग करून लोकांकडून पैसे उकळले जातात. अशा प्रकारच्या ऑनलाईन फ्रॉडपासून कसे वाचायचे, अॅपच्या (Mobile Loan App) माध्यमातून लोन देण्याचे प्रलोभन देणाऱ्यांपासून दूर कसे राहायचे? हे जाणून घेऊ या...
कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्या
लोकांची ऑनलाईन फसवणूक होऊ नये, म्हणून सरकार वेगेवगळ्या पद्धतीने काळजी घेते. अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूक रोखण्यासाठीदेखील सरकार काळजी घेते. सध्या असे अनेक अॅप्स आहेत, जे अवघ्या काही मिनिटांत कर्ज देण्याचा दावा करतात. मात्र कर्ज देण्यासाठी आरबीआयने गाईडलाइन्स तयार केल्या आहेत. कर्ज देताना कर्जदात्या कंपन्यांना या नियमांचे पालन करावे लागते. तुम्ही एखाद्या ॲपच्या माध्यमातून कर्ज घेणार असाल, तर अगोदर त्या कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्या. कंपनीविषयीची माहिती काढा. त्यांच्या अटी वाचून घ्या. लोन देणाऱ्या ॲपचा कोणत्या एनबीएफसी, बँकेशी करार आहे, ते तपासा.
प्ले स्टोअरवरूनच ॲप डाऊनलोड करा
ॲपच्या माध्यमातून लोन घ्यायचे असेल तर संबंधित ॲप प्ले स्टोअरवरूनच डाऊनलोड करा. ईमेल, एसएमएस, समाजमाध्यमांनी सुचवलेले अॅप्स डाऊनलोड करू नका.
केवायसी करून घ्या
संबंधित ॲप तुमच्याकडून केवायसी करून घेत आहे का, हे तपासा. हे ॲप तुमच्याकडून केवायसी करुन घेत नसेल, तर संशयास्पद बाब आहे. कारण केवायसीची प्रक्रिया वेळखाऊ असली तरी, तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे.
कर्जाचा करार तपासा
लोन देणारे खरेखुरे ॲप तुम्हाला लोनचे करारपत्र देईल. यामध्ये प्रोसेसिंग फी, लोनची किंमत, व्याजदर, रेपेमेंट शेड्यूल याची सर्व माहिती यात असते. एखादे ॲप तुम्हाला ही मादिती देत नसेल, तर खरबदारी घेतली पाहिजे.
ॲडव्हान्स पैशांची मागणी
लोन देण्याचे आमिष दाखवून फसवेगिरी करणारे ॲप्स तुम्हाला ॲडव्हान्स पैसे मागतील. तसे झाल्यास सतर्क व्हा.
ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या
कर्जासाठी कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी ग्राहकांचे मत काय आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्या. त्यासाठी कमेंट्स सेक्शन जरूर पाहावे.
हेही वाचा :
चिंता सोडा! 'या' पाच स्टॉक्समध्ये पैसे गुंतवा अन् तगडे रिटर्न्स मिळवा, एकदा वाचाच!
SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!
मैदानात धावांची कमाई, गुंतवणुकीतही सिक्सर! धोनी भाईने पुण्यातल्या 'या' कंपनीत टाकले पैसे!