Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत अद्याप सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे. नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच आता छगन भुजबळ हे प्रचार सभा गाजवणार आहेत.  


महायुतीचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार मंत्री छगन भुजबळ यांच्या चंद्रपूर मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहे. 


छगन भुजबळ प्रचार सभा गाजविणार 


या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे आज विदर्भात दौऱ्यावर निघाले आहेत. ते चंद्रपूरला रवाना झाले आहेत. छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. नाशिक तिढा सुटलेला नसताना ते आता प्रचार सभा गाजविणार आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक


याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक आहे. त्यामुळे मी प्रचाराला निघालो आहे. जाण्या-येण्याची सोय करण्यात आली आहे. जिथे जिथे सभांसाठी सोय केली आहे. तिथे तिथे आम्ही प्रचार करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.


ओबीसींच्या मुद्द्यांवर डागणार तोफ


प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर बोलणार असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. ओबीसींचा मुद्दा निघतो, त्यावेळी ओबीसींच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कोणी ताकद दिली त्याचा उहापोह या प्रचार सभेत केला जाणार आहे. आमदारांचे घर जळत असताना शांत कोण बसले? या सर्व गोष्टीचा उहापोह होणार आहे. तसेच युक्रेन, इराण, इस्राएलचे वातावरण तापले असताना देशाला मजबूत सरकारची गरज आहे. हे प्रचाराचे महत्वाचे मुद्दे आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 


नाशिकच्या जागेबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?


नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेबाबत आज काही चर्चा होणार नाही. प्रफुल्ल पटेल यांची भेट होणार नाही. बोलायचे असेल तर आम्ही फोनवर बोलू. ज्याला तिकिट मिळेल त्याचे आम्ही काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


आता लढायचं आणि जिंकायचं! आठ दिवसांचे अनुष्ठान करत शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात