मुंबई : टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ज या क्रिकेट संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. सध्याच्या आयपीएलच्या (IPL) हंगामात तो जोरदार फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे त्याचे जगभरात लाखोंनी चाहते आहेत. हाच धोनी क्रिकेटच्या समान्यादरम्यान जसा नेहमी सतर्क असतो, तशाच पद्धतीने तो गुंतवणुकीच्या बाबतीतही सतर्क राहून गुंतवणूक करतो. सध्या त्याने पुण्यातील एका इलेक्ट्रिक सायकल तयार करणाऱ्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
धोनीला ईक्विटित मिळणार मालकी
पुण्यातील ई-मोटारॅड (emotorad) नावाची कंपनी ई-सायकलची निर्मिती करते. या कंपनीत धोनीने गुंतवणूक केली आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल गुप्ता यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या स्ट्रॅटिजिक इन्व्हेस्टमेंटमुळे धोनीला ई-मोटोरॅड या कंपनीत इक्विटी ओनरशिप मिळणार आहे. कंपनीमार्फत निर्माण केल्या जाणाऱ्या ई-सायकलींची जाहिरातही धोनी करणार आहे.
2020 साली कंपनीची स्थापना
धोनीने याआधीही अनेक कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. यात बंगळुरूतील फिटनेस स्टार्टअप Tagda Raho, खाताबुक, गुरुग्राम येथील जुन्या कारची विक्री करणारी Cars24 आदी कंपन्यांचा समावेश आहे. सध्या धोनीने ई-मोटारॅड या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. ही गुंतवणूक नेमकी किती आहे, हे अद्याप समजू शकलेले ना्ही. मात्र गुप्ता, राजीव गंगोपाध्या, आदित्य ओझा, सुमेध बट्टेवार यांनी 2020 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीच्या म्हणण्यानुसार ई-सायकलच्या बाजारावर या कंपनीचे 65% वर्चस्व आहे. इक्विटीच्या माध्यमातून या कंपनीने आतापर्यंत एकूण 20 दशलक्ष डॉलरर्सचा निधी उभारलेला आहे.
270 कोटी रुपयांपर्यंत विक्री वाढवण्याचे धेय्य
EMotorad या कंपनीचे देशात एकूण 350 पेक्षा अधिक डीलर्स आहेत. मार्च 2024 पर्यंत गेल्या वित्तीय वर्षात कंपनीने 140 कोटी रुपयांची विक्री केली होती. त्याआधीच्या वित्तीय वर्षात ही विक्री 115 कोटी रुपये होती. चालू वित्तीय वर्षीत हीच विक्री 270 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे या कंपनीचे लक्ष्य आहे. यातही ही कंपनी देशांतर्गत 130 कोटींची तर उर्वरित विक्री अमेरिका आणि युरोपच्या बाजारात करण्याचे लक्ष्य या कंपनीने निश्चित केलेले आहे.
75 टक्के विक्री ऑफलाईन
ई-मोटारॅड या कंपनीची 70 टक्के उत्पादने ऑफलाईन पद्धतीनेच विकली जातात. उर्वरित उत्पादाने ही Amazon आणि Flipkart यासारख्या ऑनलाईन स्टोअर्समार्फत विकली जातात. आता धोनीनेच थेट गुंतवणूक केल्यामुळे या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे.
हेही वाचा :
हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?
कोट्यधीश उद्योगपतीने हे काय केलं? संपूर्ण संपत्ती दान करून घेतला धक्कादायक निर्णय!