Gold Price: सोनं खरेदी करताना तुम्ही अगोदर त्याचा भाव पाहून घेता. दागिन्यांच्या दुकानात गेल्यावर तुम्ही अगोदर सोन्याचा भाव विचारून घेता आणि नंतरच सोनं खरेदी करायचं की नाही, हे ठरवता. सोन्याच्या भावात रोज चढ-उतार होत असतो. मात्र सोन्याचा भाव नेमका कसा ठरवला जातो? हे अनेकांना माहिती नसते. याच पार्श्वभूमीवर सोन्याचा हा भाव नेमका निश्चित होतो? त्यासाठीचे नियम काय आहेत? हे जाणून घेऊ या....   


सोन्याचा भाव नेमका कसा ठरवला जातो?


तुम्ही ज्या भावाने सोनं खरेदी करता त्याला स्पॉट रेट म्हटले जाते.  हा भाव मल्टी कमोडिटी एक्स्जेंच्या (MCX)  मदतीने ठरवला जातो. भारतीय बाजारत सोन्याची मागणी, पुरवठा लक्षात घेऊन तसेच जागतिक बाजारातील चलनवाढ लक्षात घेऊन MCX वायदा बाजारात सोन्याचा भाव ठरवला जातो. यासह सोन्याचा भाव निश्चित करण्याआधी एमसीएक्सकडून बुलियन मार्केट असोशिएशन यांच्याशी समन्वय साधले जाते. त्यानंतर लेव्ही, व्हॅट, खर्च जोडून सोन्याचा भाव ठरवला जातो.


कोणकोणत्या गोष्टींचा सोन्याच्या भावावर प्रभाव पडतो?  


सोन्याचा दरावर देशांतर्ग तसेच जागतिक घडामोडींचाही प्रभाव पडतो. यासह आर्थिक आणि राजकीय पातळीवरील घडामोडींमुळेही सोन्याचा दर कमी-अधिक होत असतो. समजा आपल्या देशात सोन्याच्या आयातीसंदर्भात एखादा नवा नियम लागू झाला, तर त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर होतो. तर सोन्याची निर्यात करणाऱ्या देशांनी एखादा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम आपल्या देशातील सोन्याच्या दरावर होत असतो. 


स्पॉट प्राईज कशी ठरवली जाते?  


तुम्ही ज्या किमतीवर सोन्याची खरेदी करता त्याला स्पॉट प्राईज म्हटले जाते. या भावाला शक्यतो त्या-त्या शहरातील सराफा एकत्र येऊन ठरवत असतात. प्रत्येक शहरात सराफा व्यापाऱ्यांची एक संघटना असते. ही संघटना एकत्र येऊन हा भाव ठरवते. म्हणूनच प्रत्येक शहरात सोन्याच्या दरात कमी-अधिक प्रमाणात फरक पाहायला मिळतो. 


विदेशात सोन्याचा दर कसा ठरवला जातो? 


जगभरातील सोन्याचा दर ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर एक मंच आहे. या मंचाला लंडन बुलियन मार्केट म्हणून ओळखले जाते. 2015 सालाच्या अगोदर लंडन गोल्ड फिक्सद्वारे सोन्याच्या भावाचे नियमन केले जायचे. मात्र 20 मार्च 2015 नंतर लंडन बुलियन मार्केट असोशिएशनच्या माध्यमातून सोन्याचा भाव ठरवण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या संघटनांशी विचार-विनिमय करून जागतिक पातळीवर सोन्याचा भाव ठरवला जातो.  


हेही वाचा :


तब्बल 53000 टक्क्यांनी रिटर्न्स, शेअर विकायला कोणीही तयार नाही; अनेकांना श्रीमंत करणाऱ्या 'या' पेनी स्टॉकची सगळीकडे चर्चा का होतेय?


गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्यांवर पैशांचा पाऊस, मिळणार तब्बल 150 टक्क्यांनी रिटर्न्स; RBI ने नेमका काय निर्णय घेतला?