मुंबई : रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत: किंवा कुटुंबीयांना आरोग्य समस्या निर्माण झाल्यावर चांगलीच धांदल उडते. मात्र ऐनवेळी हाच त्रास होऊ नये म्हणून आरोग्य विमा हा पर्याय आहे. आरोग्य विम्यामुळे आजाराशी भिडताना आर्थिक ओढाताण होत नाही. पण आता हाच आरोग्य विमा आगामी काही काळात महागण्याची शक्यता आहे. भविष्यात आरोग्य विमे साधारण 10 ते 15 टक्के महागण्याची शक्यता आहे. नुकतेच बीमा रेग्‍युलेटर आयआरडीएआय (IRDAI) विम्यासंदर्भातील काही नियमांत बदल केले आहेत. बदलांमुळे आरोग्य विमा महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  


लवकरच प्रमियममध्ये वाढ होण्याची शक्यता


IRDAI ने आरोग्य विम्यासंदर्भात काही नियम बदलल्यानंतर आता विमा कंपन्यादेखील आपल्या धोरणात काही बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच धोरणबदलाअंतर्गत विम्याचे प्रमियम महागण्याची शक्यता आहे. तशा प्रकारचे मेलदेखील विमा कंपन्यांकडून  ग्राहकांना पाठवले जात आहेत. तुम्हाला चांगल्यातला चांगला प्लॅन देता यावा म्हणून आम्हाला प्रमियममध्ये काहीशी वाढ करावी लागत आहे, असे या मेलमध्ये सांगण्यात येत आहे. सध्याच्या काळात कोणत्याही उपचारावरील खर्चाचे प्रमाण वाढत आहे. याच वाढत्या खर्चाला लक्षात घेऊनही कंपन्या विम्याचे प्रिमियम वाढवण्याचा विचार करत आहेत. 


पॉलिसी रिन्यू करताना येणार मेल


HDFC Ergo या विमा कंपनीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विम्यांच्या प्रीमियममधील वाढ थोडीशी त्रासदायक वाटू शकते. मात्र जेव्हा गरज असते तेव्हाच अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. विशेष म्हणजे अशा प्रकारे प्रिमियममधील वाढ ही IRDAI ला सांगूनच केली जाते, असे HDFC Ergo ने म्हटले आहे. आरोग्यविमा रिन्यू करायचा असेल, तर याच प्रिमियमवाढीची झळ सामान्यांना बसू शकते.  पॉलिसीधारकांची रिन्यू डेट जवळ आल्यानंतर प्रिमियममध्ये झालेल्या बदलांचा मेल येऊ शकते.  


आरोग्यविम्यासाठी आता वयाची अट नाही


ACKO जनरल इन्शुरन्स कंपनीचे उपाध्यक्ष रूपिंदरजीत सिंह यांनीदेखील या प्रिमियमवाढीचे संकेत दिले आहेत. विमा कंपन्यांच्या प्रमियममध्ये 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, IRDAI ने बदललेल्या नियमांनुसार  आरोग्य विम्यासाठी वयाची अट राहणार नाही. म्हणजेच कोणत्याही वयाची व्यक्ती आता आरोग्य विमा काढू शकणार आहे. अगोदर आरोग्य विम्यासाठी वयाची अट 65 वर्षे होती. वयानुसार वेगवेगळे आजार होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे आता प्रिमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा :


फॉर्म-16 म्हणजे नेमकं काय रे भाऊ, या कागदपत्रामुळे कर कसा वाचू शकतो?


'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!


खुशखबर! EPFO देणार तब्बल 50 हजार रुपयांचं बोनस, पण पूर्ण करावी लागणार 'ही' अट!