Gold Price : ग्राहकांना मोठा दिलासा; सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात घसरण, चोवीस तासात पंधराशे रुपयांची घसरण
Gold Price : साडेतीन मुहूर्त पैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताकडे पाहिले जाते. जळगावच्या सुवर्ण नगरीत गुढी पाडव्याचा मुहूर्त हा सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून मानला जातो.
Gold Price : सोनं खरेदीसाठी गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त अनेकजण साधत असतात. आजही सराफाबाजारात मोठी गर्दी दिसून येतेय. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली होती. मात्र गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात जळगावात 1500 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर चढे असले तरी हौसेला मोल नसतं. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लगीनसराईचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक जण आज सोनं खरेदीसाठी बाजारात आलेले दिसत आहे. आजच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे
साडेतीन मुहूर्त पैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताकडे पाहिले जाते. जळगावच्या सुवर्ण नगरीत गुढी पाडव्याचा मुहूर्त हा सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून मानला जातो. अनेक नागरिक या दिवशी सोने खरेदी करून हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत असतात. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केलेली सोन्याची खरेदी ही शुभ असते. या दिवशी केलेली खरेदी भरभराटी देणारी असते अशी अनेक ग्राहकांची श्रद्धा आहे. ग्राहक या दिवशी सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा मात्र सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक ग्राहकांचे बजेट बिघडणार आहे.
सोने खरेदीला प्रतिसाद मिळेल, विक्रेत्यांना विश्वास
दरवर्षी गुढी पाडव्याला मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. यंदा सोन्याचे भाव जास्त असल्याने ग्राहक खरेदीसाठी येतील का अशा प्रकारची चिंता व्यापाऱ्यांना होती. मात्र गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची घसरण झाल्याने आज सोन्याचे भाव 58800 तर जीएसटीसह 60500 रुपये इतके आहे. हेच भाव काल 59300 तर जीएसटीसह 62050 इतके होते. आज घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगली संधी निर्माण झाल्याने सकाळपासूनच ग्राहकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण दिवसभरात ग्राहक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे
"...तरीही सोने खरेदी करणार"
सोन्याचे दर वाढले असले तरी सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून आम्ही गुढीपाडव्याला सोने खरेदी करत असतो. सोन्याचे दर वाढल्याने बजेट बिघडले असले तरी सोन्याची खरेदी एक प्रकारची गुंतवणूक असते. त्यात सोने दागिने ही महिलांची हौस असते आणि हौसेला मोल नसल्याने भाव काहीही असले तरी आम्ही सोने खरेदी करत असल्याचं ग्राहकांचं म्हणणे आहे.