Gold Rate : सोन्याचे दर 3300 रुपयांनी घसरले, चिंता करु नका दरात 20 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता, तज्ज्ञ म्हणतात...
Gold Rate : देशांतर्गत फ्यूचर मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरण सुरु आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Gold Price Prediction नवी दिल्ली: देशांतर्गत फ्यूचर मार्केटमध्ये सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात तेजी आणि घसरण सुरु आहे. शुक्रवारी म्हणजेच 14 नोव्हेंबरला सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्य वायद्याच्या सोन्याचे दर 3300 रुपयांनी घसरले. तर, चांदीच्या दरात देखील 6900 रुपयांची घसरण झाली. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या मनात सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरण होणार असा प्रश्न आहे. मनीकंट्रोलमधील एका रिपोर्टनुसार येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळू शकते.
Gold Rate Expert Prediction : तज्ज्ञांनी काय म्हटलं?
लक्ष्मी डायमंडसचे चेअरमन आणि एमडी चेतन मेहता यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये जागतिक स्तरावर केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदार सोने खरेदी सुरु ठेवू शकतात. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. मेहता यांच्या मतानुसार दिवाळीनंतर सोन्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. मेहता यांच्या मतानुसार सोन्याचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात.
जुन्या सोन्याचं एक्सचेंज वाढलं
चेतन मेहता यांनी सोन्याबद्दल आणखी माहिती देताना म्हटलं की यावेळी सोने खरेदी करणाऱ्यांकडून एक ट्रेंड पाहायला मिळत आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर जुन्या सोन्याला एक्सचेंज करत आहेत. दिवाळीच्या हंगामात खरेदी झालेल्या सोन्यामध्ये 40 ते 50 टक्के सोन्याच्या वाटा एक्सचेंज गोल्डचा होता. या तिमाहीत जुनं सोनं देऊन नवं खरेदी करण्याचं प्रमाण 20 ते 25 टक्के राहू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
सोन्याच्या दागिन्यांपेक्षा लोक सोन्यातील गुंतवणुकीत पैसे वाढवत आहेत. मेहता यांच्या मतानुसार लग्नाच्या हंगामात यामध्ये बदल पाहायला मिळू शकतात. चेतन मेहता यांनी दागिन्यांबद्दल माहिती देताना म्हटलं की छोट्या किंवा मध्यम वजनाच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. सॉलिटेअरच्या विक्रीत घसरण पाहायला मिळाली आहे.
सोने दरात वाढ का?
जगभरात जेव्हा अस्थिरता निर्माण होते किंवा तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं. 2025 मध्ये घडलेल्या विविध घटनांमुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता, केंद्रीय बँकांकडून डॉलर ऐवजी सोने खरेदीला प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळं सोन्याचे दर वाढू लागले आहेत. डिसेंबर 2024 च्या तुलनेत सोन्याचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहेत.

























