नवी दिल्ली: आगामी अर्थसंकल्प हा आधीच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा असणार आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सरकार कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य, मेडिकल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट आणि टेलिमेडिसिन या क्षेत्रांसाठी एक चांगलं वातावरण विकसित करणं महत्वाचं आहे. याचसोबत रोजगाराच्या आव्हानाला नव्या दष्टीकोनातून बघायला हवं, व्होकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयांवर भर देणं गरजेचं आहे.'


लोकांनी आपल्या सूचना द्याव्यात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी CII पार्टनरशीप समिट 2020 ला संबोधित करताना सांगितलं की, "लोकांनी सरकारला एक वेगळा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सूचना द्याव्यात. आम्ही अशा प्रकारचा अर्थसंकल्प तयार करणार आहोत जो भारताच्या 100 वर्षात अशा प्रकारच्या महामारीनंतर तयार झाला नसेल. लोकांनी सूचना दिल्या तर हे शक्य आहे. लोकांच्या सूचनांचा आधार घेतच एक वेगळा अर्थसंकल्प आम्ही तयार करणार आहोत."


भारत ग्लोबल ग्रोथ इंजिन बनेल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा संसदेत 1 फेब्रुवारी 2021 रोजी मांडण्यात येणार आहे. कोरोनामुळे ज्या क्षेत्रात मंदी आली आहे त्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच नव्या मागणीमुळे ज्या क्षेत्रात तेजी येत आहे अशा क्षेत्रांवरही लक्ष देण्यात येणार आहे. भारताकडे चांगला विकासदर प्राप्त करण्यासाठी जे काही आवश्यक असते ते सर्व म्हणजे, लोकसंख्या, बाजारपेठ आणि क्षमता ते सर्व काही आहे. भविष्यात भारत हा ग्लोबल ग्रोथ इंजिन असेल यात काही शंका नाही. जगाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी भारत महत्वाची भूमिका बजावेल."


महत्वाच्या बातम्या: