वॉशिंग्टन: कोरोनाच्या संक्रमणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यातून भारतीय अर्थव्यवस्था हळू हळू सावरत आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गुरुवारी सांगितलंय. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे. उपभोक्त्यांच्या वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला अजून गती येण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 23.9 टक्क्यांनी घसरण झाली होती.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य प्रवक्ता गॅरी राईस यांनी सांगितलं की, भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संक्रमणाची मोठी झळ सहन करावी लागली होती. आता त्यातून सावरत ती हळू हळू मार्गावर येताना दिसतेय.


कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने केलेल्या उपाययोजनेच्या संबंधित प्रश्नांना उत्तर देताना गेरी राईस म्हणाले की, राजकोषीय, मौद्रिक आणि आर्थिक क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे उद्योग, कृषी आणि दुर्बल घटकांना सहाय्य मिळालं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन ती सावरताना दिसतेय.


राइस पुढे म्हणाले की, "आम्हाला आशा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी भारत सरकारकडून सध्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल."


त्या आधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आंतरराष्ट्रीय मौद्रीक आणि वित्तीय समिती या मंत्री स्तरीय समितीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधन करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की भारतातील उपभोक्त्यांच्या वाढलेल्या मागणीमुळे आणि अनेक क्षेत्रांच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था तीव्र गतीनं वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.


महत्वाच्या बातम्या: