जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडित प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही. राजकीय हेतूने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'या' गलिच्छ राजकारणाचा सूत्रधार जळगाव जिल्ह्यातीलच एक बडा नेता आहे, असा खुलासा भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचा थेट नामोल्लेख करणे टाळत त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. हा त्यातलाच प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


जळगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात रावेर तालुक्यातील निंभोरा येथे गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या विषयासंदर्भात खुलासा करण्यासाठी गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी जळगावात त्यांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत गिरीश महाजन यांनी सविस्तर म्हणणे मांडले.


उच्च न्यायालयात मागितली दाद


गिरीश महाजन पुढे म्हणाले की, माझ्यावर राजकीय उद्देशाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बनावट आहे, हे प्रथमदर्शनी सिद्ध होते. ही घटना जर पुण्यात घडली, तर गुन्हा तिकडे दाखल व्हायला हवा होता. फिर्यादी जळगाव शहरातील रहिवासी आहे, तर जळगावात गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. पण गुन्हा रावेर तालुक्यातील निंभोरा सारख्या ग्रामीण भागात का दाखल झाला? हा प्रश्नच आहे. हा गुन्हा राजकीय उद्देशाने दाखल झाला आहे. म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत या गुन्ह्यात कोणतीही कार्यवाही करू नये, दोषारोपपत्र दाखल करू नये, असे आदेश दिले आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासावे, मोबाईल लोकेशन तपासावे, अशी माझी मागणी आहे.


गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुंबईतून दबाव


या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुंबईतून दबाव आणला गेला. राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, त्यात मी देखील पुरावे सादर करणार आहे. या गुन्ह्याची माहिती झाल्यानंतर मी पोलिसांना विचारणा केली. तेव्हा पोलिसांनी आमच्यावर मुंबईतून, गृहखात्याकडून दडपण असल्याचे सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाकडून असा प्रकार होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. मी देखील 30 वर्षे राजकारणात आहे, पण मी कधीही असे राजकारण केले नाही. आम्हाला एफआयआरची साधी प्रत मिळाली नाही. यावरून पोलिसांवर किती दबाव आहे, याचा प्रत्यय येत आहे, असेही महाजन यांनी सांगितले.


सत्तेचा दुरुपयोग सुरू


सत्ता आहे म्हणून सूडाच्या राजकारणाचे असे प्रकार सुरू आहेत. दररोज कोणत्याही एखाद्या प्रकरणात काहीतरी पत्र द्यायचे, चौकशी लावायची, असाच प्रकार सुरू आहे. पक्ष आमच्या सोबत आहे. आतापर्यंत आम्ही गप्प बसलो. आता आम्हीही मुद्दे मांडू. आम्ही असे खोटेनाटे गुन्हे नाही तर पुराव्यासह मुद्दे मांडू. विरोधक अशा पद्धतीने वागत असतील तर आम्हीही जशास तशे उत्तर देऊ. पण आम्ही खोटं मांडणार नाही, तर जे खरे आहे तेच आम्ही करू. ईडीचे राजकारण भाजप करत नाही. कुठे आहे ईडीचे राजकारण, ते दाखवून द्यावे. ईडीच्या बाबतीत भाजपवर होणारे आरोप खोटे आहेत, असेही ते म्हणाले.


भाजपचा एकही आमदार फुटणार नाही


महाविकास आघाडी सरकारकडून भाजपचे आमदार फोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजपचे आमदार फोडणार, या नुसत्या अफवा आहेत. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सरकारकडून हे प्रकार सुरू आहे. या सर्व कपोलकल्पित गोष्टी आहेत. आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.


बीएचआर प्रकरण काय, हे लवकरच समोर येईल


बीएचआर हे प्रकरण नेमकं काय आहे, हे तपासात समोर येईलच. या प्रकरणात कशा पद्धतीने गैरव्यवहार झाला आहे, ते समोर येईल. त्यानंतर सर्वांना सत्यता कळणार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सुनील झंवर हे माझेच नाही तर सर्वांचे जवळचे आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पण वेळ आली की बदलायचे हे चुकीचे. माझ्याशी संबंध जोडणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.


महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा


राज्यभर ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्या. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ग्रामपंचायतच नव्हे तर त्यांनी जिल्हा परिषद लढवली तरी हरकत नाही, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले.