Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त, आर्थिक गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय?
Pawan Munjal ED Action : हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांची 24.95 कोटींचीं संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे.
ED Action on Pawan Munjal : हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) कार्यकारी अध्यक्ष आणि चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांना ईडीने (ED) दणका दिला आहे. प्रवर्तन निदेशालय (ED) म्हणजे ईडीने पवन मुंजाल (Pawan Munjal) यांची 24.95 कोटींची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. ईडीने पवन मुंजाल यांची दिल्ली येथील मालमत्ता जप्त केली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA-Ministry of Corporate Affairs) हिरो मोटोकॉर्प कंपनीविरोधात तपास सुरु केला होता. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.
54 कोटींची मनी लाँड्रिंग
ईडीने पवन मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्याच्यावर 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन भारताबाहेर बेकायदेशीरपणे नेल्याचा आरोप करण्यात आला होता.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मदत
पवन मुंजाल यांनी इतर लोकांच्या नावाने जारी केलेले परकीय चलन मिळवले आणि नंतर त्याचा परदेशात वैयक्तिक खर्चासाठी वापर केला, असे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. परकीय चलन अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचार्यांच्या नावाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने काढून घेतले आणि नंतर ते पवन मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिल्याचं समोर आलं आहे.
पवन मुंजाल यांच्या घरी ईडीची छापेमारी
ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल आणि इतर काही जणांवर ऑगस्ट महिन्यामध्ये छापेमारी केली होती. दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील परिसरात छापे टाकण्यात आले होते. ईडीच्या छापेमारीची बातमी समोर आल्यानंतर, हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स कोसळले होते.
याआधी आयकर विभागाचीही छापेमारी
दरम्यान, पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभागाने याआधी 2022 मध्ये छापेमारी केली होती. यावेळी सुमारे 36 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद पंजाबमध्ये छापे टाकण्यात आले होते. आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कॉर्प ग्रुपवर छापे टाकले होते.
40 देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय
हिरो मोटोकॉर्प कंपनी 2001 मध्ये एका वर्षात सर्वाधिक दुचाकी विक्री करणारी जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी ठरली होती. कंपनीने सलग 20 वर्षे पहिलं स्थान कायम राखलं आहे. कंपनीचे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 40 देशांमध्ये व्यवसाय आहे.