(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dell Layoffs : AI चा नोकऱ्यांना फटका? डेल कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना घरचा रस्ता, 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना
Dell Layoffs : डेल कंपनीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे.
Dell Layoffs : इंटेलनंतर आता जगातील आघाडीची संगणक उत्पादक कंपनी डेलनेही टाळेबंदीची घोषणा केली आहे. डेल कंपनीने आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका 12,000 कर्मचाऱ्यांना बसणार असून त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. डेल कंपनीच्या विक्री विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. याचा फटका कंपनीच्या व्यवस्थापक, संचालक, उपाध्यक्ष अशा मोठ्या पदांवर असलेल्या लोकांनाही होणार आहे.
सेल्स टीमला मोठा फटका बसेल
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, डेलने कर्मचाऱ्यांना इंटरनल मेमोद्वारे या लेऑफ योजनेची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे की ती आपल्या सेल्स टीममध्ये बदल करणार आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित विक्री युनिटही तयार करण्यात येणार आहे. कंपनीला AI वर फोकस वाढवायचा आहे. मात्र कंपनीने नेमके किती कर्मचारी कामावरून काढून टाकणार याची माहिती दिलेली नाही. परंतु 10 टक्क्यांहून अधिक कर्मचारी त्याचे बळी ठरतील असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन स्कीमवर काम सुरू
ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट या नावाखाली डेल कंपनीचा हा इंटर्नल मेमो देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्या माध्यमातून कंपनीच्या व्यवसायाला नवी दिशा देण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय. पुनर्रचना व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे प्राधान्यक्रमही बदलत असून कंपनीच्या विक्रीबद्दल पुन्हा विचार केला जात आहे.
डेलच्या विक्री विभागातील अनेक कर्मचारी दावा करतात की, त्यांना त्यांच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या ओळखीचे अनेकजणही टाळेबंदीचे बळी ठरले आहेत. या टाळेबंदीचा सर्वात मोठा परिणाम व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांवर झाला आहे. त्यापैकी काही 20 वर्षांहून अधिक काळ कंपनीशी संबंधित होते. याशिवाय मार्केटिंग आणि ऑपरेशन टीमही टाळेबंदीचा बळी ठरली आहे. सध्या एका व्यवस्थापकाकडे किमान 15 लोकांची टीम असते.
2023 मध्ये 13,000 कर्मचारी काढले होते
डेल कंपनीमध्ये 2023 मध्ये 13,000 कंर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता डेलमधून तितक्याच प्रमाणात नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्या वर्षी जगभरात मंदी आल्याने तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जवळपास 1,20,000 नोकऱ्या गेल्या होत्या.
ही बातमी वाचा: