Share Market: शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात
Stock Market Updates: शेअर बाजारात आज सार्वजनिक बँका , ऑईल अॅन्ड गॅस, पॉवर आणि मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच ते सात टक्क्यांची घसरण झाली.
मुंबई: गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस नुकसानीचा ठरला असून आज एकाच दिवसात शेअर बाजारातील लाखो कोटींचा चुराडा झाल्याचं दिसून येतंय. देशाचा अर्थसंकल्प चार दिवसांवर आला असून त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक आपटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 874 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 287 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.45 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,330 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.61 टक्क्यांची घसरण होऊन 17,604 तो अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही अंकांची घसरण होऊन तो अंकांवर पोहोचला.
शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक झाली, पण अवघ्या काहीच मिनिटांमध्ये पुन्हा घसरण झाली. त्यानंतर शेअर बाजारात शेवटपर्यंत घसरण सुरूच राहिली. या आधी बुधवारीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, त्यामध्ये गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, पण त्या आधीच शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे बाजाराला स्थिरता देण्यासाठी, त्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काय पाऊलं उचलणार हे पाहावं लागेल.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Tata Motors- 6.34 टक्के
- Bajaj Auto- 5.90 टक्के
- Dr Reddys Labs- 2.69 टक्के
- ITC- 1.99 टक्के
- Divis Labs- 1.55 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Adani Enterpris- 18.52 टक्के
- Adani Ports- 16.29 टक्के
- SBI- 5.06 टक्के
- ICICI Bank- 4.45 टक्के
- IndusInd Bank- 3.44 टक्के