LIC : एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा
LIC Latest News : एलआयसी एजंट्स आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने चार मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एजंटसना (LIC Agents) मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने एलआयसी कर्मचारी (LIC Employee) आणि एलआयसी एजंटसाठी (LIC Agents) ग्रॅच्युइटी, फॅमिली पेन्शनसह अनेक फायदे जाहीर केले आहेत. सरकारने ग्रॅच्युइटी मर्यादा, एजंट रिन्यूएबल कमिशन, कौटुंबिक विमा, कर्मचारी तसेच एजंट्ससाठी मुदत विमा कवच वाढवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा 13 लाखांहून अधिक एलआयसी एजंटना फायदा होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिवाळीपूर्वी एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने एलआयसी (एजंट) विनियम 2017 मध्ये सुधारणा करून एलआयसी एजंटना कर्मचार्यांना ग्रॅच्युइटी, कौटुंबिक पेन्शन विमा यासारख्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये होणार आहे. एलआयसी एजंटची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ग्रॅच्युइटीसोबतच त्यांना आता विमा संरक्षणाचाही लाभ मिळणार आहे. सरकारने विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने विमा संरक्षणाची सध्याची मर्यादा 3,000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचार्यांसाठी कुटुंब कल्याणासाठी 30 टक्के एकसमान दराने कौटुंबिक निवृत्ती वेतन (Family Pension) मंजूर केले आहे. सरकारच्या या निर्णयांचा फायदा LIC च्या 13 लाखांहून अधिक एजंटांना होणार आहे. तर, त्याचवेळी एक लाखाहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
LIC ची सुरुवात 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या भांडवलाने झाली होती. आज ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीची उलाढाल 40.81 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. एलआयसीकडे विश्वासार्ह विमा कंपनी म्हणून समजले जाते. देशातील गावागावांमध्ये एलआयसीचे विमाधारक आहेत.
पहिला तिमाही निकाल कसा होता?
एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात (LIC net Profit) 1299 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीचा नफा 9543 कोटी रुपये झाला आहे. गुंतवणुकीवरील मिळालेल्या अधिक उत्पन्नामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 682 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. 30 जूनपर्यंत सकल NPA 2.48 टक्के होता. मागील वर्षी याच कालावधीत 5.84 टक्के होता. कंपनीचा निव्वळ एनपीए मागील वर्षीप्रमाणेच शून्य राहिला आहे. मात्र, एलआयसीच्या पॉलिसी विक्रीत घट झाली आहे. जूनच्या तिमाहीत वैयक्तिक विभागामध्ये एकूण 32.16 लाख पॉलिसी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी याच तिमाहीत 36.81 लाख पॉलिसी विकल्या गेल्या होत्या.