Rakesh Jhunjhunwala Portfolio : राकेश झुनझुनवाला यांची मुहूर्त ट्रेडिंगवर 101 कोटींची कमाई; 'या' पाच स्टॉकने दिला नफा
Stock Market News:: दिवाळीनिमित्त असलेल्या खास मुहूर्त ट्रे़डिंगमध्ये मुंबई शेअर बाजारचे बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांनी पाच स्टॉकमधून 101 कोटींची कमाई केली.
Rakesh Jhunjhunwala Portfolio muhurt trading : शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांनी यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्या पोर्टफोलिओतील स्टॉकमधून 101 कोटींची कमाई केली. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील अनेक शेअर्सने चांगले रिटर्न्स दिले आहेत.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत इंडियन हॉटेल्स या स्टॉक आहे. दिवाळीनिमित्त असलेल्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रामध्ये हा शेअर 6 टक्क्यांनी वधारला होता. भारतीय हॉटेलसह टाटा समूहाच्या टाटा मोटर्सनेचा शेअरदेखील चांगला वधारला.
टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत एक टक्क्यांनी वधारली आणि 490.05 रुपयांवर बंद झाला. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 3.67 कोटी शेअर आहेत. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत टाटा मोटर्सच्या शेअरचे मूल्य मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी 1783 कोटी रुपये होते. मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रात याचे मूल्य 17.82 कोटींनी वाढून 1800 कोटी झाली. टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत यावर्षी 162 टक्क्यांनी वाढली आहे.
मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रात इंडिया हॉटेल्सच्या शेअरचे मूल्य 5.95 टक्के वाढून 215.45 रुपये इतके झाले. बुधवारी इंडियन हॉटेल्सची किंमत 507.70 कोटी रुपये होती. मात्र, मुहूर्त ट्रेडिंग सत्रामध्ये याची किंमत वाढून 31.13 कोटी रुपयांनी वाढून 538.84 कोटी झाली.
रेटिंग आणि रिसर्च एजन्सी 'क्रिसील'च्या शेअरच्या किंमत 2 टक्क्यांनी वाढली. राकेश झुनझुनवाला यांच्याजवळ असलेल्या या शेअरचे मूल्य 1144 कोटी रुपये झाले. बुधवारी याचे मूल्य 1123 कोटी रुपये होते. मुहूर्त ट्रे़डिंग दरम्यान 21.72 कोटी रुपयांचा फायदा झाला.
त्याशिवाय, 'एस्कॉर्ट्स' या शेअरची किंमत दोन टक्क्यांनी वाढली. त्यामुळे झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील स्टॉकचे मूल्य 960 कोटींहून 978 कोटी झाले. डेल्टा कॉर्प या शेअरमधूनही झुनझुनवाला यांना 12.6 कोटींचा लाभ झाला. मुहूर्त ट्रे़डिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.3 टक्क्यांनी वधारली होती.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
दरवर्षी दिवाळीमध्ये केवळ एका तासासाठी स्पेशल ट्रेडिंगचं आयोजन केलं जातं. या खास ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं शेअर मार्केट एक तासासाठी सुरु होतो आणि गुंतवणूकदार एक छोटी गुंतवणूक करुन शेअर मार्केटमधील ट्रेडिंगची परंपरा निभावतात. दरम्यान, यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की, दिवाळीच्या दिवशी बाजारात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. आजच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं गुंतवणूकदार अधिकाधिक खरेदी करतात.