Adani Group Stocks: अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, कंपनीनं स्पष्टीकरण दिलं, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटलं
Adani Group Stocks: उद्योगपती गैतम अदानी यांच्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये आज तेजी पाहायला मिळाली.
Adani Group Stocks मुंबई : शेअर बाजारात आज उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जीसह अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर या घडामोडी पाहायला मिळाल्या. चेअरमन गौतम अदानी, सागर अदानी, अदानी ग्रीनचे एमडी आणि सीईओ विनीत जैन यांनी अमेरिकेतील न्याय विभागाच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे. अदानी ग्रीनच्या दाव्यानुसार लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांचं नाव नसल्याचं सांगण्यात आलंय. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.
अदानी ग्रीन एनर्जी : 6.62 टक्के
अदानी एंटरप्रायझेस : 6.02 टक्के
अदानी एनर्जी सोल्युशन्स : 9.70 टक्के
अदानी टोटल गॅस लिमिटेड : 8.81 टक्के
अदानी पोर्ट्स : 2.91 टक्के
अदानी विल्मार : 4.67 टक्के
अदानी पॉवर : 7.88 टक्के
सांघी इंडस्ट्रीज :1.97 टक्के
एनडीटीव्ही :4.30 टक्के
अंबुजा सिमेंट : 2.29 टक्के
अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये मंगळवारी घसरण पाहायला मिळाली होती. आज दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली असता अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर 920.75 रुपयांवर होता. तर, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2223.40 रुपयांवर होता. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर 636.50 रुपयांवर होता.
शेअरमध्ये तेजी का?
अदानी ग्रीन एनर्जीच्या दाव्यानुसार लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी, सागर अदानी यांचं नाव अमेरिकीतील प्रकरणात नाही. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की,क्रमांक 1 आणि 5 इतरांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मात्र, यामध्ये क्रमांक 1 मध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी सोडून इतरांवर आरोप आहेत. केवळ अज्यूर आणि सीडीपीक्यू च्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे, असं रोहतगी महणाले.
अमेरिकेतील न्याय विभाग, अमेरिका प्रतिभूति आणि विनिमय आयोग कंपनी लाचखोरी प्रकरणात चौकशी करत आहे. अदानी ग्रुपनं आरोप फेटाळतं बीएसई आणि एनएसईवर त्यांची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, मानांकन संस्था मुडीजनं अदानी ग्रुपच्या 7 कंपन्यांचं रेटिंग स्थिरवरुन नकारात्मक केलं होतं. अदानी पोर्टस अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन स्टेप वन लिमिटेड, अदानी ट्रान्सपोर्टेशन , अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदानी इंटरनॅशनल कंटेन टर्मिनल या कंपन्यांच्या रेटिंगबाबत मुडीजनं निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)