BLOG | ॲनिमा-ॲनिमस
Blog : एखादी व्यक्ती भित्री भागुबाई आहे, एखादा पुरुष बायल्या आहे किंवा एखादी बाई ढालगज आहे, असे शिक्के आपल्याकडे तयार असतात.
लोक जसे आहेत तसे न स्वीकारता त्यांना बदलण्यात किंवा त्यांच्या वागण्याबद्दल त्रास करून घेण्यात आपला किती वेळ वाया जातो? जुन्या काळात 'स्वतंत्र पार्टी' नावाचा एक पक्ष होता. या पक्षाचे संस्थापक पिलू मोदी एकदा म्हणाले होते की, "मंत्रिमंडळातील एकमेव 'पुरुष' म्हणजे इंदिरा गांधी आहेत."मन सुद्ध तुझं' या मालिकेचा बारावा भाग पाहताना पिलू मोदींच्या या वाक्याची आठवण झाली.ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे.
मनोविकार तज्ज्ञ डॉ. उदय देशपांडेंच्या क्लिनिकमध्ये एक दिवस त्यांचा कॉलेजमधला मित्र शशांक भाले येतो. खूप वर्षांनी भेट झाल्यामुळे डॉक्टर उत्साहात त्याच्याशी बोलतात. पण त्या मित्राचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा असतो. शशांक भाले हा आधीपासूनच मैदानी खेळापासून दूर राहणारा आणि कलाकुसर, नक्षीकाम वगैरेमध्ये रमणारा असतो. त्यामुळे त्याला कॉलेजमध्येही सतत चिडवले जात असते. मग शशांक खगोलशास्त्रात मन गुंतवतो. बदमाश सजिवांपेक्षा निर्जीव ग्रहतारे त्याला जवळचे वाटतात. त्यातच खगोलशास्त्राचे प्राध्यापक घुगे यांची मुलगी नीला ही डेरिंगबाज म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध असते. आश्चर्य म्हणजे नीला आणि शशांक प्रेमविवाह करतात आणि आज तोच विवाह काडीमोडापर्यंत येऊन ठेपलेला असतो.
शशांकने आपल्या हिटलर वडिलांचा विरोध पत्करून लग्न केल्यामुळे या जोडप्याला सहा खोल्यांच्या घरात अगदी शेवटची कुबट खोली मिळते. त्यावर शशांक वडिलांना काहीच बोलत नाही. अर्धे आयुष्य त्या खोलीत कुजल्यानंतर जेव्हा वाटण्या होतात तेव्हाही तीच खोली त्यांना मिळते. त्यावरही शशांक काहीच बोलत नाही. हे पाहून नीलाच्या संतापाचा स्फोट होतो. तिला शशांकच्या स्वभावाचा प्रचंड राग येतो आणि ती माहेरी निघून जाते. तिचा मुलगा होस्टेलमध्ये असतो आणि मुलगी शशांकजवळ. हा घटस्फोट वाचावा म्हणून शशांक डॉक्टरांकडे आलेला असतो.
डॉक्टर नीलाशीही बोलतात. ती शशांकच्या बुळेपणाची तक्रार करते तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की, कार्ल युंग नावाचा एक मनोविकार तज्ज्ञ होता. त्याने सांगून ठेवले आहे की, "प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीतत्व आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला असतो. त्यांना शास्त्रीय भाषेत ॲनिमा-ॲनिमस असे म्हणतात. हे संतुलन कमी जास्त झाले की, पुरुषामध्ये स्त्रीची लक्षणे किंवा या उलट होते. तसे तुम्हा दोघांचे झालेले आहे. नीला तोंडावर फटकळपणे बोलते हा तिचा स्वभाव आहे आणि शशांक घरच्यांना दुखावत नाही हा त्याचा स्वभाव आहे."
त्या कुबट खोलीत आयुष्य घालवण्यापेक्षा तुम्ही दोघांनी तुमचे स्वतंत्र जग का निर्माण केले नाही, असाही प्रश्न डॉक्टर विचारतात. त्यावर नीलाकडे उत्तर नसते. घरातल्या घरात मालमत्तेचा हक्क मिळवण्याच्या हट्टापायी लोक आयुष्य घालवतात. आयुष्य संपते आणि मालमत्ता मात्र येथेच पडून राहते. तुम्ही कशासाठी आयुष्य खर्ची घालता याचा कधी तरी विचार केला पाहिजे. अखेर नीला शशांकला भेटायला राजी होते. त्यांचे पुढे काय होते? डॉक्टर त्यांच्या मुलांशी काय बोलतात हे पुढच्या भागात कळेलच. भेटूया पुढील रविवारी.
मनाचा थांग शोधणार्या या मालिकेचे मागील सर्व भाग यू-ट्युबवर पाहू शकता.