एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... तरीही 'एलफिन्स्टन' मुंबईकरांच्या लक्षात राहिल
महाराष्ट्राच्या जनतेवर त्याने उपकार केले आहेत. त्याची आठवण नंतरच्या काळात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी महाराष्ट्राच्या जनतेला राहील.. अगदी एल्फिन्स्टन स्थानकाचं नामकरण प्रभादेवी झालं असलं तरीही...
“त्यांनी गोडीगुलाबीने प्रजेची मनं राजी केली, त्यांच्यापुढे आलेल्या मोठमोठ्या प्रश्नाचा उदार अंत:करणाने निकाल करुन लोकांना खुष ठेवले. अत्यंत सुधारलेल्या प्रभूने अर्धवट सुधारलेल्या प्रजेचं संगोपन कसे करावे हे पूर्णपणे जाणून मुंबई इलाख्याचे राज्य चालवले. इत्यादी गोष्टी जोपर्यंत लोक आठवतील, तोपर्यंत एल्फिन्स्टन साहेबांचे नाव मागे राहील”
-लोकमान्य टिळक, ‘केसरी’ ता. 12 मार्च सन 1895
1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा प्रदेश मुंबई इलाक्याचा भाग बनला. यानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर म्हणून सूत्रं हातात घेतली. उदारमतवादी, सुसंस्कृत आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून अल्पावधीत त्याने लौकिक मिळवला. भारतीय राज्यव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत त्याने क्रांतिकारी बदल केले. त्यावेळी आपण घेतलेले निर्णय इथल्या जनतेच्या पचनी पडतील याची त्याने पूरेपूर दक्षता घेतली. 19 व्या शतकाच्या प्रारंभी इथे कायदा, सुव्यवस्थेची स्थिती ढासळली होती. सतत होणारी युद्धं, पेंढारी, चोर, दरोडे यामुळे जनता त्रस्त झाली होती. या काळात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणेची त्याने उभारणी केली. त्यामुळे एल्फिन्स्टनच्या काळात ब्रिटीश राजवट म्हणजे ईश्वरी वरदान आहे असं इथल्या जनतेला वाटू लागलं होतं. पेशवाईच्या काळात जमीन महसूलात कमालीची घट झाली होती. एल्फिन्स्टनने जमीन महसूल पद्धतीची पुनर्रचना केली.
एल्फिन्स्टनच्या काळात मुंबई प्रांताच्या शिक्षण व्यवस्थेत बरेच बदल झाले. 1823 मध्ये त्याने शिक्षणविषयक नवीन योजना तयार केली. 1824 ला मुंबईत इंजिनिअरींग कॉलेज सुरु झालं. मुंबई इलाख्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने शाळा सुरु करण्यासाठी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. एल्फिन्स्टन हा या संस्थेचा अध्यक्ष आणि मुख्य आधारस्तंभ होता. 1824 ला एल्फिन्स्टन हायस्कूल आणि 1835 ला एल्फिन्स्टन कॉलेज सुरु झालं. महाराष्ट्रातली अनेक नामवंत मंडळी याच शाळा आणि कॉलेजात शिकली.
कुणी म्हणतं एल्फिन्स्टनला हे सगळं करण्यामागे भारतीयांचा कळवळा नव्हता.. त्याला इंग्रज प्रशासनासाठी कारकून तयार करायचे होते. हेतू काहीही असो..त्याचं कार्य कसं नाकारता येईल?
प्रशासनाच्या सोईसाठी तत्कालीन मुंबई प्रांताचं विभाजन पाच भागात पहिल्यांदा केलं ते एल्फिन्स्टननेच... पुणे, खान्देश, कर्नाटक, अहमदनगर आणि सातारा हे ते प्रांत.. किरकोळ अपवाद वगळता ही पद्धत आजही आपण जशीच्या तशी वापरतो.
निवृत्तीनंतर 1829 आणि 1834 मध्ये दोन वेळेला त्याला गव्हर्नर जनरल हे सर्वोच्च पद देण्याचं तत्कालीन इंग्लंड सरकारने ठरवलं होतं. पण त्याने ते नाकारलं..
शेवटी...मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रँट डफने एके ठिकाणी लिहून ठेवलंय.. एल्फिन्स्टनचे नाव अगदी सार्थपणे ब्रिटिश सरकारच्या कर्तृत्वाशी निगडीत झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर त्याने उपकार केले आहेत. त्याची आठवण नंतरच्या काळात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी महाराष्ट्राच्या जनतेला राहील..
अगदी एल्फिन्स्टन स्थानकाचं नामकरण प्रभादेवी झालं असलं तरीही...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement