(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | बॉलिवूड..शिवसेना.. कंगना आणि बरंच काही!
हिंदी इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे आणि मुंबईचा रिमोट अनेक वर्षं शिवसेनेकडे असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि बॉलिवूडचे संबंध नेहमीच चांगले राहिले. पण कंगनाच्या वक्तव्याने त्याला तडा दिला.
रामगोपाल वर्माच्या सरकार सिनेमातला गाजलेला संवाद आहे. मुझे जो सही लगता है, मैं वो करता हूं. वो चाहे पुलिस, कानून और पूरे समाज के खिलाफ क्यू ना हो. याच संवादाची प्रचिती सध्या कंगना प्रकरणात येताना दिसू लागली आहे. कंगनाने दर्पोक्ती केल्यानंतर शिवसेनेने बीएमसीद्वारे कंगनाच्या ऑफिससमोर बुलडोझर उभा केला. शिवसेनेचा असा पवित्रा अनेकांसाठी नवा आहे. बॉलिवूडबद्दल शिवसेनेने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत त्याची जबाबदारीही घेतली. या निर्णयांबद्दल मतमतांतरं असतीलही कदाचित. पण त्या निर्णयाची छाया मुंबई-महाराष्ट्राच्या वाटचालीवर कधीच पडली नाही.
बॉलिवूड आणि मुंबई यांचे संबंध नेहमीच आई आणि तिच्या बाळासारखे राहिले आहेत. बॉलिवूडला या मुंबईने वाढवलं. त्याचं पालन पोषण केलं. मुंबईवरही बॉलिवूडने प्रेम केलं. तिला आपल्या सिनेमातून वारंवार दाखवलं. हिंदी इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे आणि मुंबईचा रिमोट अनेक वर्षं शिवसेनेकडे असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि बॉलिवूडचे संबंध नेहमीच चांगले राहिले. पण कंगनाच्या वक्तव्याने त्याला तडा दिला.
शिवसेनेचा उगम होण्याआधीपासूनच हिंदी इंडस्ट्री मुंबईत आकाराला आली. पुढे शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने बाळासाहेब ठाकरे हा नेता मुंबईला महाराष्ट्राला दिला. बाळासाहेब हे मूळचे कलाकार. उत्तम व्यंगचित्रकार. अत्यंत मार्मिक शैलीत समाजातलं, माणसातलं व्यंग बाहेर काढण्यात त्यांचा हातखंडा धरणारा आजवर झाला नाही. म्हणून बाळासाहेबांना कलाकाराबद्दल आपुलकी होती. मग ती कोणतीही कला असो. चित्रकला, गायन कला, नाट्य, नृत्य सर्वच कलांबद्दल बाळासाहेबांना आणि ठाकरे कुटुंबियांना आपुलकी होती. ठाकरे कुटुंबियांच्या ताकदीची कल्पना बॉलिवूडला आधीपासून होतीच. इंडस्ट्रीला आपल्या ताकदीची कल्पना आहे हे ठाकरे कुटुंबियही जाणून होतेच. पण म्हणून ठाकरे कुटुंबियांपैकी कुणीच बॉलिवूडला आपणहून हात लावला नाही. जेव्हा केव्हा इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी मातोश्रीचा दरवाजा वाजवला तेव्हा तेव्हा तो आदरानेच उघडला गेला. एका कलासक्त कुटुंबाने एका कलाकाराचा केलेला तो आदरच होता.
बाळासाहेबांचा दरारा.. त्यांची महाराष्ट्रावरची निष्ठा.. त्यांचं राहणं.. त्यांचे निर्णय घेणं.. त्यांच्यावर ओढवलेले वाद.. त्यांची भाषणं याचं कमालीचं कुतूहल बॉलिवूडला होतं. सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि सिनेमाचं प्रतिबिंब समाजावर पडतं. त्या अर्थाने ठाकरे घराण्याचा राज्यातल्या जनमानसावर असलेला प्रभाव लक्षात घेऊनच बॉलिवूडनेही त्यांच्यावर सिनेमे बनवले. सरकार, बॉम्बे, ठाकरे या हिंदी सिनेमांसह झेंडा, बाळकडू आदी अनेक सिनेमाची आठवण यानिमित्ताने होते. बाळासाहेबांनी या सगळ्यांवर लक्ष ठेवलं पण त्याचा त्रास कधी इंडस्ट्रीला होऊ दिला नाही.
हे सगळं अशासाठी की इंडस्ट्रीही हे जाणून होती. म्हणूनच रजनीकांत मुंबईत आला की मातोश्रीवर जायचे. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, कपूर खानदान, सलमान खान, शाहरूख खान इतकं कशाला दस्तूरखुद्द मायकल जॅक्सनही याला अपवाद नाही. शाहरूख, सलमानचं सोडून देऊ. पण कलाकार जेव्हा प्रतिभावंत तेवढे त्याचे ठाकरे घराण्यासोबतचे संबंध मोकळे असायचे. कारण, कलाकाराच्या प्रतिभेची कदर ठाकरे घराण्यालाही होती आणि ठाकरे घराण्याच्या हातात असलेल्या कलेची जाणीव कलाकाराला होती.
मराठी मंडळींना तर बाळासाहेब आणि ठाकरे घराणं घरचं वाटायचं. आजही वाटतं. दादा कोंडके, दामू केंकरे, शाहीर साबळे यांच्यापासून अजय-अतुलपर्यंत अनेकांशी ठाकरे घराण्याचे कौटुंबिक संबंध आहेत. कारण मुळात या घराण्यालाच कलेचं अंगण आहे. अर्थात संबंध जपताना वेळोवेळी ठाकरे सरकारने भूमिकाही घेतलीच. त्यावेळी वादाची फिकीरही त्यांनी केली नाही. याची प्रचिती महाराष्ट्रासह देशाला आली ती 1995 मध्ये. संजय दत्तच्या गळ्याभवतीचा फास घट्ट होत असतानाच सुनील दत्त यांनी आपल्या मुलाला बाळासाहेबांच्या पायावर घातलं. बाळासाहेबांनीही त्याच्या डोक्यावर हात ठेवला.
हा हात आपण ठेवल्यावर काय होणार आहे हे बाळासाहेब जाणून नव्हते असं अजिबात नाही. पण त्यांनी ती जबाबदारी घेतली. ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनांचा, भाषेचा, मराठी अस्मितेचा फटका कलाकारांनाही बसला. पण ही कडवट गुळणी गिळण्यावर ब़ॉलिवूडने भर दिला. कारण, उद्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्याजवळचा हुकमी एक्का ठाकरे आहेत हे प्रत्येकजण जाणून होता. ठाकरेंवर.. मुंबईवर त्यानंतरही टीका होत राहीली. पण शिवसेनेनं ते फार मनावर घेतलं नव्हतं. कलाकारांवर थेट हात उगारायची वेळ सेनेवर आली नव्हती.
शिवसेनेनंही बरीच आंदोलनं केली. पण ती त्या त्या मुद्याला धरून होती. त्यावेळी त्यांच्या भूमिकेआड जो आला त्याला सेनेचा फटका बसला. पण सरसकट राग धरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कारवाई केली नाही. आजही शिवसेना अनेक कलाकारांना मदत करते आहे. पण कंगनाच्या वक्तव्यानंतर मात्र शिवसेनेचा पवित्रा बदलला. वाचाळवीर कंगनाच्या वक्तव्यावर शांत असलेल्या शिवसेनेने आपल्या भात्यातून थेट बुलडोझर काढला आणि बुधवारचं चित्र बदलून गेलं. आता शिवसेनेच्या या कृत्याचा परिणाम काय होतो हे पाहाणं कुतुहलाचं ठरणार आहे.
सौमित्र पोटे यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग
BLOG | सुशांतला पहिला तडा दिलेल्या संजनाचं काय?
BLOG | निशीच्या बातमीवेळी नेमकं घडलं काय?
BLOG | आत्महत्या कधी थांबायच्या? BLOG | इतकी कसली घाई आहे? BLOG | ए. आर. रेहमानला अनावृत्त पत्र... BLOG | आत्महत्येनंतर एका आठवड्याने... BLOG | टू डू ऑर नॉट टू डू! BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर! BLOG | एग्झिट चुकलीच इरफान! BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर!