संपूर्ण देशभरात धुमाकूळ घालत असलेला 'कोरोना' लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी नियंत्रित होता. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये काढली असली तरी केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यासोबत या काळातील शिथिलता जाहीर केल्या. त्यामुळे काही नागरिकांना हायसे वाटत असले तरी हा काळ खऱ्या कसोटीचा आहे. महाराष्ट्रातील काही शहरात अजूनही कोरोनाचा धोका कायम असून आरोग्य यंत्रणा एकदिलाने याचा मुकाबला करत आहे. सरकारने आर्थिक व्यवहार सुरु करुन जीवनमान हळू-हळू पदपथावर येण्याकरिता काही बाबतीत शिथिलता दिली आहे. असे असली तरी संभाव्य धोके लक्षात घेऊन स्वतःला एक नवीन शिस्त लावून पुढचे आयुष्य सर्वांनाच जगावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे कुणाला कोरोना झाला तर घाबरून जाऊ नका, आणि शिथिलता मिळाली आहे तर त्यांचा गैरफायदा घेऊ नका. राज्यात तीन जूननंतर बऱ्याच गोष्टी टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे.



मुंबई शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे, म्हणूनच की काय धारावीतील बाधितांसाठी धारावी मध्येच फिल्ड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. तसेच पोलिसांसाठी सुद्धा वरळी येथे त्याचप्रमाणे एक रुग्णालय उभारण्यात आले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे मुंबई शहरातील आकडेवारी वाढणारच. कारण त्या शहराची रचना त्यापद्धतीने आहे. घनदाट लोकवस्ती सोबत, झोपडपट्टीमध्ये लोकं खूपच असतात. अशावेळी या आजाराचा संसर्ग कुणाला होऊ नये, हे खरं आरोग्य व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान आहे. अनेक दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाची टीम रात्र-दिवस येथे स्वतःचा जीव धोक्यात घालून राबत आहे. त्यांना रोज अनेक आव्हानांचा सामना येथे करावा लागतो. केवळ येथील नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहावे म्हणून सगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. ज्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी शिथिलतेमुळे सामान्य जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल, पण सगळ्या गोष्टी काळजीपूर्वकच केल्या पाहिजे.


केंद्र शासनाने पाचवा लॉकडाऊन जाहीर केला असला तरी निर्बंध शिथिल करण्याचे बरेच अधिकार राज्य सरकाला देण्यात आले आहे. त्यामुळे अनलॉक संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टॅक्सी, बस, लोकल सुरु करण्याकरिता इतक्यात परवानगी देणे योग्य ठरणार नाही. लाखोंच्या संख्येत अनेकांना क्वॉरंटाईन केंद्रात ठेवण्यात आले आहे. स्मशानभूमीमध्ये शेवटचे अंत्यविधी करण्याकरिता रांगा लागत आहे, एकंदर परिस्थिती अजूनही जितकी आटोक्यात येणे अपेक्षित आहे, तितकी अजून आलेली नाही. याकरिता अजूनही प्रशासन जोरदारपणे विविध उपाययोजना करीत आहे. रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या दारोदारी जात आहे, 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' वर भर देण्यात येत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही योग्य वेळीच त्याचा अटकाव करता यावा यासाठी आशा वर्कर शहर पालथे घालत आहे.


जे काही सुरु आहे ते सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. याकरिता आता या शिथिलतेच्या काळात नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. स्वतःला एक स्वयंशिस्त लावून घेली पाहिजे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच निघावे, हात साबणाने स्वच्छ धुणे आपल्या हाताने डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये. दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर ठेवले पाहिजे. अनेक लक्षणविरहीत नागरिकांना माहित नसतं की ते स्वतः एक रुग्ण आहे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. त्यामुळे त्यांचा चाचणी करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सावधगिरीने वावर केला पाहिजे. या काळात आपण आणि कुटुंबातील सदस्य निरोगी राहतील त्यापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. शिवाय ज्या पद्धतीने मागील चार लॉकडाउनमध्ये ज्याप्रमाणे काही गरज नसताना घरी पडले नाही तसं जर शक्य असेल तर त्यांनी घराबाहेर पडूच नये. 'वर्क फ्रॉम होम' करणे शक्य असेल तर करावे.

आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे याकरिता प्रशासन अनेक गोष्टी करत आहे. महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नर्शीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे चार हजार विद्यार्थी एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप एक मार्च 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पुर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पदवीदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत.


आजही अनेक कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयात तात्काळ बेड्स मिळत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये बेड्स भरले असून नागरिक मिळेल त्या पद्धतीने उपचार घेत आहे. कारण संकटच स्वरूप खूप अक्राळ-विक्राळ अनपेक्षित असे आहे. शिथिलता मिळाल्याचा आनंद घेताना या सर्व गोष्टीचा विचार करावा, आपल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण निर्माण होणार याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग