एक्स्प्लोर

रेडलाईट डायरीज : काळजावरचा घाव .... 

सत्तोचं बालपण अतिशय खडतर गेलेलं. आपल्या करुण शैशवात आई गेल्याचं शल्य ती कधीच विसरू शकली नाही. कधी काळी तिच्या कुमारवयात तिने आई व्हायचं स्वप्न बघितलं असावं पण रांड म्हणून जगताना आपल्या या स्वप्नाचा चक्काचूर होताना तिने उघड्या डोळ्यानं पाहिलेलं. इतर कुणा बायकांची लेकरे सांभाळावीत असंही तिला कधी वाटलं नाही.वेश्यांमध्ये अशा अनेक मुली बायका इतरांची अपत्ये सांभाळतात, आपली मातृत्वाची हौस भागवून घेतात, काहीजणी तर त्यांना आपला पान्हाही देतात.

पाचेक महिन्यापूर्वी सत्तो मेली.  वयाच्या नवव्या वर्षी बळजोरीने 'धंद्यात' आलेल्या आणि सोळाव्या वर्षी आई झालेल्या सत्तोने काही वर्षापूर्वी मुंबईला झालेल्या भेटीत विचारले होते, "बाईवर बलात्कार झाल्यावर तुम्ही लोक म्हणता तिने सन्मान गमावला, तिच्या चारित्र्यावर डाग लागला, तिची जिंदगी बर्बाद झाली, .... असलंच बरच काही अमुक तमुक. तुम्ही बरळता.... आता मला सांग, बाईचा सन्मान फक्त लुगडयातच असतो का? तिची तेव्हढीच ओळख आहे का? बलात्कार होणे म्हणजेच तिची अब्रू जाणे हे कसे काय ठरवले? तिची अब्रू म्हणजे तिची जननेंद्रियंच हेच खरं का? रेप होण्याने जिंदगी बर्बाद का आणि कशी होते? बलात्कार झाल्यावर बाईने तोंड लपवून घरात बसावे अशीच तुमची अपेक्षा असते हे खरे की नाही? खरे तर बलात्कार करणाऱ्य़ाची जिंदगी बरबाद झाली असं तुम्ही म्हणायला पाहिजे पण तुम्ही म्हणत नाही..... अरे तुम्ही बाईला फक्त आणि फक्त मादी म्हणूनच बघता रे...." तोंडातला माव्याचा लाळभरला थुंका पचकन थुकून झाल्यावर तिने पुढे विचारले  होते, "मग त्या अर्थाने मला आणि माझ्या लूत भरल्या जिंदगीला तू काय म्हणणार ? एखादी कुत्री बरी की जी फक्त काही महिन्यातच अनेकांकडून लोचली जाते. आमचं काय? आम्हीच ** फाडून बसलो आहोत (अत्यंत अर्वाच्च शिवी देत) त्याला जमाना काय करणार? पण आम्ही का फाडून बसलो आहोत?" फॉकलन रोड, तिसरी गल्ली, चौथा मजला, अर्मान मॅन्शन इथं राहणाऱ्या सत्तोला दुसरा निवारा शोधावा लागला होता. ती जिथे राहत होती त्या इमारतीला धोकादायक ठरवत तिचे पाडकाम सुरु झालं आणि तिची दुनिया विस्कटून गेली होती. या काळादरम्यानच मी तिच्या पुढ्यात आलो होतो. मला आठवतंय, माझे मुंबईतले मित्र नितीन राणे तेंव्हा फोन करून विचारत होते की, ‘काही मदत हवीय का सांग.’ वकिलांपासून ते हव्या तितक्या आर्थिक मदतीची विचारणा केली होती. पण सत्तोला ना पैसा हवा होता न तिचा कोर्ट मॅटर झाला होता. सत्तो माणसांच्या बाजारातून उठली होती पण जनावरांच्या दुनियेतही जमा नव्हती. तिच्यासोबत जे घडलं होतं ते जगात कुणाबरोबरही घडू नये... मधूनच डोळे पुसणारी, गुटखा खात वेड्यागत हसत बोलणारी पंचेचाळीसच्या आसपास वय असणारी सत्तो मला कधी कधी मॅक्समुल्लरपेक्षाही भारी लॉजिक पर्सन वाटते. सत्तोच्या मूळ शब्दात सारं काही लिहिणं कठीण आहे. कारण सत्य नागडं असतं आणि जगाला ते उघडपणे मांडलेले आवडत नसतं. सत्तो जे बोलायची ते जगासाठी अभद्र, गलिच्छ, शिवराळ आणि असभ्य होतं. तर तिच्या मते तेच खरं सत्य होतं.  सत्तोचे शब्द भाल्याहून टोकदार होते, त्यात कमालीचा जोश होता. तिच्या भाषेत जगाबद्दलचा विखार भरला होता, पुरुषांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार होता. मनात जणू विटाळ साठला होता जो शब्दातून लाव्ह्यासारखा बाहेर पडे. सत्तोचं पूर्ण नाव मला कधी कळलं नाही, किंबहुना तिनं कधी सांगितलं नाही. नाव विचारलं की वसकायची. "नाम पूछकर सोयेगा क्या? नाम देखकर कम-ज्यादा करेगा क्या? शादी करने आया क्या?" असे सौम्य सवाल लागलीच झडत असत. बहुतांशी शिव्यांची लाखोली वाहिली जायची. सत्तोचं खरं नाव सत्यवती होतं. सत्यवती प्रकाश इतकं तिनं सांगितलेलं. प्रकाश तिच्या वडिलांचं नाव. आडनाव सांगितलं नाही. कोरगा जातीची होती इतकं सुनावलं होतं. आम्ही चांडाळ होतो असंही म्हणायची. गावाचा पत्ता विचारला तर हे लोक कधीच खरा पत्ता सांगत नाहीत, कारण पत्ता विचारणारा त्याचं काय करणार याचीच धास्ती असते आणि ती बहुतांशी खरी व रास्त असते. कारण लोक गोड बोलून पत्ते हुडकून काढतात आणि त्यातून नवा छळवाद जन्माला घालतात ही सर्रास चालणारी बाब आहे. त्यामुळे सत्तोनेही पत्ता सांगताना आढेवेढे घेतले, पण तिच्या आवडत्या जिनसा दिल्यावर मग बोलती झाली. ती कर्नाटकमधल्या उडुपी जिल्ह्यातली. कुंदापुरा कोड्लूर असा पुसट उल्लेख केलेला. कोड्लूरपासून काही किलोमीटर अंतरावर एका वाडीवर तिचं कुटुंब वस्ती करुन होतं. तिला आठ दहा भावंडे असल्याचं तिला आठवतं. बापाने दोन बायका केलेल्या. दुसऱ्या बायकोपासूनही अपत्यं झालेली. तिची आई एका आजारपणात मेलेली. त्या नंतर तिची परवड होत गेली. तिच्याहून थोरल्या बहिणीला आणि तिला तिनं हिवाळ्यातल्या सर्द रात्री झोपडीबाहेर काढलेलं. तिच्यावर दया आलेल्या काही लोकांनी जातपंचायत बोलावण्याचा सल्ला दिला. पंचांपैकी एकाच्या घरी ती गेली आणि तिची अब्रू लुटली गेली. त्या माणसानं आपल्या बायकोसमोर आपली इज्जत लुटल्याचं सांगताना सत्तोच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होतं. त्याच्या बायकोनंच तिचे कपडे फाडून काढले आणि तिला तो कुस्करत असताना ती अधाशासारखं बघत बसली होती. दोनेक दिवस तिला त्या अधमाच्या घरी कोंडून ठेवलं गेलं. तिसऱ्या रात्री त्यानेच तिला एका शिवारात नेऊन सोडलं आणि तिने बाहेरच्या लोकांसमवेत शारीरिक संबंध ठेवल्याची आवई उठवली. सत्यवतीविरुद्धच पंचायत भरणार अशी चिन्हे दिसू लागली. पुढच्या अघोर कर्माच्या भीतीने तिची बहिण घाबरुन पळून गेली. ती कुठे गेली आणि तिचे पुढे काय झाले हे सत्यवतीला उभ्या आयुष्यात कधीच कळाले नाही आणि नंतर नंतर तिनेही ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सत्यवती वाईट चालीची असल्याचे कानोकानी बोलले जाऊ लागले तेंव्हा तिला वस्तीवर परत यायचे मार्ग बंद झाले. दोन दिवस तिने तसेच अन्नपाण्याविना काढले तेंव्हा दुसऱ्या एका पंचाने तिचा लक्ष्यवेध केला. तिच्या असहायतेचा आणि अगतिकतेचा त्याने मनसोक्त उपभोग घेऊन तिची रवानगी हायवेवरील एका ट्रक ड्रायव्हरसोबत केली. कन्याकुमारी कोची हायवेचा तो रस्ता होता इतके तिच्या स्मरणात होते. हे सर्व घडले तेंव्हा ती फक्त नऊ वर्षाची होती. त्या ड्रायव्हरने तिला मदतीच्या आणि सुटकेच्या बहाण्याने थेट दलालांच्या हवाली केले. तिथून ती रीतसर कामाठीपुऱ्यात आली. तिची नथ उतरण्याचा सवालच नव्हता. दाम कमी आले. रंगही सावळा होता, तब्येत मात्र उफाड्याच्या अंगाची असल्याने पोटापाण्याची बेगमी झाली. हरियाणवी ड्रायव्हरने दलालाकडे देताना सत्यवतीचे सत्तो केलं आणि तेच नाव तिला चिकटलं. रेडलाईट डायरीज : काळजावरचा घाव ....  इतर सर्वसामान्य मुलींच्या मानाने सत्तोला स्त्रीचा शरीरधर्म लवकर आला. सामान्य सभ्य पांढरपेशा मुली ज्या वयात आईवडीलांच्या, बहिण भावंडाच्या कुशीत झोपी जायच्या अन बाहुलीच्या विश्वात रममाण व्हायच्या त्या वयात सत्तो दोघा तिघांसोबत विवस्त्र झोपत होती. धंद्यात आलेल्या इतर मुलींप्रमाणे तिने कांगावा केला नाही. खूप लवकर जुळवून घेतले तिने. कदाचित आपल्याला आधार नाही याची टोकदार जाणीव तिला असावी. सुरुवातीला सत्तोला मिळालेले पैसे कशात खर्च करावेत हे कळत नव्हते. पण तिच्या जातीनेच तिला एक व्यसन दिले होते ते म्हणजे बिडी पिण्याचे. बायकापोरी आणि सगळी पुरुष मंडळी तिच्या बिरादरीत बिडी ओढायची. परंपरा म्हणून आपल्या आज्ज्या पंज्या बिगर पोलक्याच्या राहत हे तिला अंधुक आठवे. भारी भरकम दारु प्याल्यावर तिनं सांगितलं की, "तेंव्हा परंपरा म्हणून तिच्या पूर्वज स्त्रिया अर्धउघड्या राहायच्या आणि आधी पोटाची गरज म्हणून अन नंतर सवय म्हणून निसंकोच पुरती उघडी होते." पुढे जाऊन सत्तो लाईनमध्ये इतकी रुळली की तिने मागे वळून पाहिले नाही. खरे तर तिच्या मागे तिच्यासाठी अश्रू ढाळणारं कुणी नव्हतंच. पण याचाही तिला नंतर सल उरला नव्हता. सत्तोने कमी वयात दुनियादारी शिकून घेतलेली. पुरुषांच्या प्रत्येक नजरेचा आणि स्पर्शाचा अचूक अर्थ ती ओळखायची. सूचक इशारे करून बोलवायची. कोणत्या पुरुषासमोर पदर पाडल्याशिवाय त्याचं लक्ष वेधता येणार नाही आणि कोणत्या पुरुषाला दोन टांगांच्या मध्ये हाणायला पाहिजे याचे मार्मिक कसब तिने अल्पावधीत हासिल केलेलं. सत्तोची बोली फिटून गेली तशी ती स्वच्छंद झाली होती. पण तिने गुत्ता बदलला नाही. की सोबतच्या बायका बदलल्या नाहीत. सत्तोने कुणाला मदतही केली नाही आणि उर्वरित आयुष्यात कुणाची मदतही घेतली नाही. ~~~~~~~~~~~ सत्तोचं बालपण अतिशय खडतर गेलेलं. आपल्या करुण शैशवात आई गेल्याचं शल्य ती कधीच विसरू शकली नाही. कधी काळी तिच्या कुमारवयात तिने आई व्हायचं स्वप्न बघितलं असावं पण रांड म्हणून जगताना आपल्या या स्वप्नाचा चक्काचूर होताना तिने उघड्या डोळ्यानं पाहिलेलं. इतर कुणा बायकांची लेकरे सांभाळावीत असंही तिला कधी वाटलं नाही.वेश्यांमध्ये अशा अनेक मुली बायका इतरांची अपत्ये सांभाळतात, आपली मातृत्वाची हौस भागवून घेतात, काहीजणी तर त्यांना आपला पान्हाही देतात. सत्तो याला अपवाद होती. सत्तोच्या काळजातलं आईपण कसं मेलं याचा तिने कधी खुलासा केला नाही. एकदा तिच्या गुत्त्यातल्या शकीलाने जाळून घेतलं तेंव्हा तिच्या मनात घनघोर आकांडतांडव झालेलं. त्यातूनच हे मतपरिवर्तन घडलं असावं. शकीला आणि सत्तो समवयीन आणि एकाच फळकुटात राहणाऱ्या. शकीलाची एकाबरोबर अशीच खूप गहरी आशिकी झाली. त्याने लाख तऱ्हेची भुरळ पाडली. तिला पार वेडी करुन सोडलं. धारावीतल्या किरायाच्या झोपडीत घेऊन गेला. काही दिवस मौजेत गेले आणि नंतर त्याने तिथे तिची दलाली सुरु केली, तिचा धंदा तिथे खोलला. तिचा विरोध क्षीण झाला होता कारण तिच्या गर्भातलं त्याचं बीज पाचेक महिन्याचे झालं होतं. पोर पाडता येईना आणि त्या कमीन्याची साथही सोडता येईना या कात्रीत ती अडकली. बघता बघता तिच्या अंगाचा अक्षरशः पाला पाचोळा झाला. गर्भार बाईशी संबंध ठेवू इच्छिणारे हौसे गवसे खास तिथे येऊ लागले. बघता बघता तिच्या अंगावरचे मांस गळून गेले, उरला तो पोटाचा वाढत चाललेला डेरा ! आठवा महिना लागला तरी हे धंदे बंद होत नव्हते, आता थोडाफार रक्तस्त्राव होऊ लागला होता. मग मात्र तिने हाय खाल्ली. तिच्या मागेपुढे कोणी रडणारं नव्हतं आणि तिच्यासाठी भांडणारंही कुणी नव्हतं. ती कामाठीपुऱ्यातून निघून गेल्यानंतर त्या अंधारलेल्या दुनियेने तिला याद करावं अशी ती दुनियाही नव्हती. कोट दीड कोट लोकं ज्या मुंबईच्या उदरात राहतात तिथं एक जीव इकडून तिकडे गेला काय ही बाब अगदी किडामुंगीहून लहान, त्यात एका रांड बाईचं इकडून तिकडे जाणं याला कोण जोखणार ? आणि कुणी काय म्हणून यात लक्ष द्यावे, कारण या लूत भरलेल्या दुनियेहून स्वतःला विलग करून घेणाऱ्या पांढरपेशी दुनियेतही शकीला आणि सत्तो असतातच. फरक इतका असतो की या सभ्य बुरख्याआडच्या बायकांच्या दुःखांचे सोहळे तरी होतात जे रेड लाईट एरियातील बायकांच्या वाट्यास येत नाहीत. असो. हताश झालेल्या शकीलाने आपल्या भोगावर जालीम उपाय शोधला. शकीलेनं मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलं. भकाभका पेटली ती. ती झोपडीही निम्मी अर्धी जळून गेली. बाजूच्या झोपड्यांनाही झळा पोहोचल्या. शकीलेनं विचारपूर्वक सगळं संपवलं होतं. जन्माला न आलेलं अर्भकही तिने सोबत नेलं. आपल्याला जे भोग वाट्याला आलेत तेच जहन्नूमपेक्षा वाईट आहेत. दोजख याहून वेगळा काय असणार. आपल्यामुळे आपल्या पोटच्या गोळ्याची आबाळ होऊ नये याची तिला काळजी होती, आपण फसलो गेलो आणि बाहेर पडलो हे तिच्या लक्षात यायला खूपच उशीर झाला होता. तब्बल दोन दिवस तिच्या जीवाचा संघर्ष सुरु होता. तिला जगायचंच नव्हतं. तिच्या याराने तिला खोटेच सांगितले की तुझं बाळ जगलंय, त्याची मी परवरिश करेन. माझ्याविरुद्ध काही बोलू नकोस. भोळया भाबड्या शकीलेने तोंड उघडले नाही. या घटनेची बातमी शकीलेच्या मृत्यूनंतरच कामाठीपुऱ्यात पोहोचली. सत्तो केईएममध्ये जाईपर्यंत शकीलेचा यार पळून गेला होता. मुर्दाघरात बेवारस म्हणून तिची लाश ठेवली होती. तिच्या शेजारच्या खणात तिचं जळून गेलेलं अर्भक होतं. ज्याला जिवंत समजून ती गप्प राहिली होती. दोन्ही जीव भेसूर दिसत होते. जवळ जाऊन पाहायची हिंमत कोणीच करत नव्हते. सत्तो मात्र थेट जवळ जाऊन उभी राहिली. तिला शिसारी आली नाही. तिचा ऊर फाटून गेला ! आपल्या ताटात जेवलेली हाडामांसाची आपली सखी अशी जळून मरावी याचा तिला जबर धक्का बसला. ती कानडीतून शिव्यांची लाखोली वाहू लागली. तिचं सर्वांग थरथरु लागलं. फुलण्याआधीच चुरगळलेलं शेजारचं कोवळं फुल तिने कपडा हटवून पाहिलं. मुलगी होती ती. सुटली बिचारी! त्या चिमुरडीला पाहून सत्तोने इतक्या मोठ्याने टाहो फोडला की पुन्हा आयुष्यात ती कधीच रडली नाही. पीएमसाठी असिस्ट करणाऱ्या दारुडयांची नजर सत्तोच्या ढळलेल्या पदराकडे होती तर सत्तोच्या डोळ्यात एकाच वेळी आसूही होते आणि अंगार होता. तिच्या हंबरड्यानंतर तिथल्या लोकांनी तिला बाहेर काढले. पुढे जाऊन सत्तोच्या आयुष्यात अनेक अस्मानी संकटे आली पण तिच्या कंठातून आवाज फुटला नाही. त्या दिवशी शकीलेच्या देहापाशीच तिचा आवाज कुंठला असावा. केईएममधून ती प्रेते कबरस्थानमध्ये नेली गेली. त्यांचे दफन काय झाले आणि सत्तो अबोल झाली. या दिवसानंतर तिच्या वागण्यात कमालीचा कठोरपणा आला ... ~~~~~~~~~~~~~~ मुंबई जसजशी वाढू लागली तशी तिला जागा अपुरी पडू लागली आणि लोकं जमिनीच्या हातभर तुकड्यासाठीही बेईमानीची नशा करू लागली. कुठलीही जागा चालू लागली. गटारे, मुतारया देखील यातून सुटल्या नाहीत, मग रेड लाईट एरिया कसा काय मागे राहील ! रस्त्यालगत असणारया इमारतींवर विशेष नजरा रोखल्या गेल्या. सगळेच कथित सेवक जनसेवक यात मलिदा वाटून खाण्यासाठी सत्वर तयार होते. बघता बघता जागा हेरल्या जाऊ लागल्या आणि तिथल्या कळकट इमारतींची विल्हेवाट कशी लावायची याचे मनसुबेही शिजू लागले. या दुष्टचक्रात सत्तो ज्या इमारतीत राहत होती ती इमारतही अडकली. एका पावसाळ्यात नोटीस डकवली गेली. 'सदर इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे, जीवित हानीचा धोका असल्याने येथील रहिवाशांनी लवकरात लवकर खाली करावी.' वर्षभरात फासे टाकले गेले आणि अर्मान मॅन्शनचे वासे फिरले. कधी टगे गुंड येऊन धमकावू लागले तर कधी प्रशासनाचे लोक कायदा सांगू लागले तर कधी बिल्डरची माणसं येऊन आमिष दाखवू लागली तर कधी एनजीओची लोकं मधला मार्ग स्वीकारण्याची मखलाशी करू लागली. दोनेक वर्षे गेली आणि जवळपास निम्मी इमारत खाली झाली. काहींनी पैसे घेतले तर काहींनी दुसरीकडे जागा ऍडजस्ट करून घेतली तर काहींनी इलाखा बदलला. हळूहळू सगळेच निघून गेले. सरकारी लोकं येऊन सांगून गेले आता दोनेक दिवसात इमारत पाडली जाणार आहे. कुणाचं उरलं सुरलं सामान असेल तर काढून घ्या. भिंतीवर लागलेली भडक पोस्टर्स, तुटक्या दारावर चिटकवलेल्या टिकल्या खिडकीत पडलेल्या गुटख्याच्या पुड्या आणि कोळ्याची जाळी यांच्या जोडीने सत्तो मागे राहिली. सत्तोच्या बरोबरीच्या सगळ्या बायका पोरी निघून गेल्या, तिच्या गुत्त्यातले सारे जीव तिथून परागंदा झाले पण सत्तो मात्र खेळणं हरवलेल्या छकुलीसारखी तिथंच राहिली. त्या ओसाड भिंतीत तिच्या आठवणी दफन होत्या त्यांच्या सोबत तिने चार दशके घालवली होती. तिची सहा वर्षाची मुलगी जिथं तापाने फणफणून मेली होती त्या कोनाड्यात ती बसून रहायची. ती मुंबईत आल्यापासून या चार बेजान भिंतींनीच तिच्यावर निरपेक्ष प्रेम केलं होतं. बाकी जालीम दुनियेनं तिच्या आयुष्यात विष कालवण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. तिथल्या आठवणी हाच तिच्या जीवनाचा आधार होता. तिथल्या तिच्या पहिल्या किंकाळ्या त्या खोल्यात कैद होत्या, तिचं पहिलं न्हाण अंथरुणातून पाझरलं तेंव्हा खिडकीतून डोकावणारा चंद्र तिच्या अंथरुणात शिरून मुसमुसून रडला होता. तिच्या मांडीवर सिगारेटचा पहिला चटका उठला तेंव्हा तिथल्या तसबिरीतले निर्जीव देव शहारले होते, मऊसूत रेशमी पाठीवर चामडी पट्ट्याचे वळ उठले होते तेंव्हा सज्जे हादरले होते. भेगा पडलेल्या तिच्या पावलांना त्या कोपचे उडालेल्या फरशांची सवय झाली होती अन तिच्या अनेक वेदनांना त्या घराने स्वतःत सामील करून घेतले होते. तिथला आरसा तिच्या डोळ्याला डोळा भिडवायला दचकायचा. तिथल्या आठवणींच्या वावटळीने तिच्या डोक्याचा भुगा केला होता आणि बघता बघता अंगाचा पाचोळा झाला होता. दुसऱ्या दिवशी सरकारी यंत्रणा आपला फौजफाटा घेऊन तिथं दाखल झाली. हळूहळू अवजड यंत्रे त्या अरुंद बोळात प्रवेशकरती झाली. आत कुणी तरी एक बाई आहे तिला बाहेर काढले पाहिजे अशी कुणकुण झाली. दोन महिला पोलिसांना आत धाडले गेले. दोनेक मिनिटात त्या दोन्ही महिला पोलिस कपाळ फुटलेल्या अवस्थेत बाहेर आल्या. बाहेर बघ्यांचा मोठा थवा गोळा झालेला. आता काही तरी बघायला मिळणार असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर तरळत होते. काही मिनिटातच डझनभर पोलिस आत शिरले. निमिषार्धात किंकाळ्यांचा कल्लोळ आसमंतात दाटून आला. बघ्यांनी टाचा वर केलेल्या तर रंडी बाजारमधील तमाशा नवा नसलेले पोलिस निर्विकार उभे होते आणि आसपासच्या इमारतींच्या खिडक्या दरवाज्यात चुरगळलेल्या निष्प्राण चेहऱ्यांची तोबा गर्दी झालेली. सत्तोचे काय झाले ही उत्कंठा त्यांच्या डोळ्यात झळकत होती. बघता बघता मळक्या परकर पोलक्यावर विटक्या साडीची लक्तरं झालेल्या सत्तोला महिला पोलिसांनी अक्षरशः फरफटत खाली आणले. सत्तो ओरडणं आता थांबलं होतं, डोळ्यांच्या गोठलेल्या बाहुल्या निर्जीव झाल्या होत्या, फाटलेल्या ओठातून रक्त येत होते. बहुधा तिचे काही दात पडले असावेत. मागील काही दिवसात तिने अंघोळ केलेली नसावी. सगळे अंग धुळीने माखलेले. श्वास घुसमटलेले. छाती मोठ्याने खाली वर व्हायला लागलेली. आधी कपाळ फुटलेल्या महिला पोलिसाने एक अर्वाच्च शिवी देत पुढे होत तिच्या कंबरेत करकचून एक लाथ घातली. बघ्यांचा जमाव खदखदून हसला. सज्जे दरवाजे खिडक्यातले स्तब्ध चेहरे कळवळले, काहींच्या विनाकारण मुठी वळल्या तर काहींच्या तोंडातून अशा शिव्या बाहेर पडल्या की जणू कानात शिसं ओतलं जावं. सत्तोने एकदा डोळे भरून सगळ्या इमारतींवर नजर फिरवली, लोकांवर नजर फिरवली आणि तिच्या चिपाडलेल्या देहातला सगळा जोश, सगळा प्राण एकत्र करत ती सर्व ताकदीने जोरात थुंकली. नंतर काही वेळ ती गुरासारखा मार खात होती. यथावकाश तिच्या देहाचे गाठोडे पोलिसांच्या गाडीत घातले गेले... ~~~~~~~~~~~~~~~ काही दिवसात अर्मान मॅन्शनचे सगळे अर्मान धुळीस मिळाले. इकडे एक दिवस लॉकअपमध्ये ठेवल्या नंतर पोलिसांनी सत्तोला ग्रांटरोड स्टेशनजवळ सोडून दिलं. तिथं ती बसून राहू लागली. लोक तिला भिकारी समजू लागले. सत्तोच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसत, एकदम निर्विकार, अचेतन ! कामाठीपुऱ्यानेही तिची आठवण काढली नाही आणि दुनियेसाठी ती आधीच मेली होती. या अवतारात सत्तोची काही वर्षे गेली. तिथल्या गर्दुल्ल्यांनीही तिला भोगली. तरीही ती तिथंच पडून असायची, कचऱ्याचा ढिगारा पडून असावा तशी ! एका पावसाळ्यात तिच्या एका जुन्या गिऱ्हाईकाने तिला बरोबर ओळखले आणि त्याला तिची दया आली. तिला घेऊन तो मथुरेला आपल्या गावी गेला. एक दिवस तिला गुपचूप देवळाबाहेरच्या भिकाऱ्यात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी वृंदावनच्या रामनेत्री लगतच्या छाटीकरा रोडवरील विधवा आश्रमात तिची रवानगी करून आला. विधवा म्हणून तिची सोय करून आला. तिचे नाव पत्ता सगळं खोटं सांगून आला पण तिला आधार देऊन गेला. सत्तो तिथं सूनसान बसून राहू लागली. विधवेच्या पांढऱ्या वेशात राहणारी सत्तो मात्र सर्वाच्या पलीकडे गेली होती. काही दिवसातच तिने राम म्हटला. तिने सत्तरी पार केली नव्हती की साठीही नाही, पण एकाएकी हाय खाऊन मेली ती. सत्तोच्या मरणाची बातमी तिच्या त्या गिऱ्हाईकास कळवली गेली. तो मागे हटला नाही, त्याने तिचे अंत्यसंस्कार केले. ~~~~~~~~~~~~ काही आठवड्यांनी तिचा तो 'आदमी' मुंबईत आला तेंव्हा त्याने आवर्जून कामाठीपुऱ्यात येऊन सत्तोच्या मृत्यूची माहिती तिच्या जुन्या सहकाऱ्यांना दिली. ते ऐकताच सगळे काही वेळ निशब्द झाले. त्या दिवशी कुणालाही जेवण गेले नाही. सत्तोचं रक्ताचं कुणी तिथं नव्हतं पण काळजाची माणसं तिथं होती. त्यांना दुःख झालं. काळजात काटा टोचल्यागत झालं. डोळ्यांना पदर लावत बायकांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. ती सांज कसनुशी होती आणि रात्रही उदासीन गेली. ~~~~~~~~ मागच्या खेपेस मुंबईला गेल्यावर सत्तोचा विषय निघाल्यावर चाळीशी गाठलेली सायरा सांगत होती, "बाबा ये लाईन में इमोशनल हो कर किसी का भला नही होता, यहां दुनिया को अपने पैरों तले कुचलना मंगता हैं, वो अपने को रगडते हैं ना ! अपने को भी उनको मसलना मंगता हैं ! वरना सत्तो के माफिक कुत्ते का मौत मरना पडता हैं !' पण हे सांगताना का कुणास ठाऊक पण सायराच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या ! सत्तोच्या जाण्याने मला खचल्यासारखे का झाले याची कारणे अजूनही मला गवसली नाहीत ! तुम्हाला ती उमजली तर मला कळवा. निदान एकांतात डोळे पुसताना काळजावरचा घाव पुसल्याचे समाधान तरी राहील....
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
ABP Premium

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Embed widget